मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्या पाच जणांविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:21 IST2018-12-07T19:21:05+5:302018-12-07T19:21:57+5:30
वीज मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्या पाच जणांविरूध्द गुन्हा
उस्मानाबाद : वीज मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुरूवारी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे २८ नोव्हेंबर व त्यापूर्वी घडली़
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणचे फिरते पथक शहरी, ग्रामीण भागात जाऊन कारवाई करते़ या पथकाने २८ नोव्हेंबर रोजी कळंब तालुक्यातील मंगरूळ गावात वीज मिटरची तपासणी केली़ त्यावेळी पाच जणांनी वीज मिटरमध्ये फरफार करीत वीजचोरी केल्याचे समोर आले़ मंगरूळ येथील बिभिषण गोविंद निंबाळकर, विश्वनाथ गोविंद निंबाळकर यांनी घरातील वीज मिटरमध्ये फेरफार करून १६ महिने वीजचोरी केल्याचे समोर आले़
या दोघांनी ३९ हजार २४० रूपयांची २९९४ युनिट वीजचोरी केली़ मंगरूळ येथीलच गोवर्धन विठ्ठल जाधव, प्रशांत गोवर्धन जाधव यांनी घरातील वीजमिटरमध्ये फेरफार करून गत २४ महिन्यात ९५ हजार ७६० रूपये किंमतीची ७१५० युनिट विजेची चोरी केली़ तसेच मंगरूळ येथीलच बाबासाहेब दिगंबर भराडे यांनी गत २४ महिन्यात घरातील मिटरमध्ये फेरफार करून ६५ हजार ८८२ रूपयांची ५४६५ युनिट वीजचोरी करीत महावितरणचे नुकसान केल्याची फिर्याद महावितरणच्या फिरत्या पथकाचे प्रमुख राजकुमार चनबसप्पा पाटील यांनी भूम ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरूध्द विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़