नगरसेवकांनी घातला मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:54+5:302021-02-05T08:15:54+5:30
फोटो (२७-१) बालाजी बिराजदार लोहारा : येथील नगरपंचायत इमारतीच्या नूतनीकरणानंतर उद्घाटनेच्या कोनशिलेवर नगरसेवकांची नावे टाकली नसल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ...

नगरसेवकांनी घातला मुख्याधिकाऱ्यांना घेराव
फोटो (२७-१) बालाजी बिराजदार
लोहारा : येथील नगरपंचायत इमारतीच्या नूतनीकरणानंतर उद्घाटनेच्या कोनशिलेवर नगरसेवकांची नावे टाकली नसल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून याचा जाब विचारला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नावे टाकण्याबाबत लेखी हमी दिल्याने या वादावर पडदा पडला.
लाखो रुपये खर्चून नगरपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. या इमारतीचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताकदिनी नगराध्यक्षा ज्योती मुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी याठिकाणी लावण्यात आलेल्या कोनशिलावर उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष ज्योती मुळे व प्रमुख उपस्थिती मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची नावे होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या दालनात जाऊन यासंदर्भात जाब विचारला. यावेळी शिंदे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर सर्वाची नावे टाकून नवीन कोनशिला बसविली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. लगेच सेनेचे गटनेते अभिमान खराडे यांनी तसे लेखी देण्याची मागणी केली. त्या कोनशिलेवर सर्व नगरसेवकांची नावे लावण्यासंदर्भात गटनेते खराडे यांनी पत्राव्दारे मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी शिंदे यांनी २ फेब्रवारीपर्यत कोनशिलेवर सर्व नगरसेवकांची नावे लावण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे कोनशिलेवरून सुरु असलेल्या वादावर २ फेब्रुवारीपर्यंत तरी पडदा पडला आहे. यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक आबुलवफा कादरी, बाळासाहेब कोरे, श्याम नारायणकर, गगन माळवदकर, श्रीकांत भरारे आदी उपस्थित होते.