मुरूम शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:18+5:302021-07-04T04:22:18+5:30

मुरूम : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसांत उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत ४०३, तर मुरूम ग्रामीण ...

Corona slowed down in rural areas, including the city of Murum | मुरूम शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वेग मंदावला

मुरूम शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वेग मंदावला

मुरूम : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसांत उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत ४०३, तर मुरूम ग्रामीण रुग्णालयात कोविड संशयित व संंपर्कातील ३५ अशा एकूण ४३८ जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये आलूर येथील ज्योती तांडा येथील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर उर्वरित ४३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून थैमान घातलेला कोरोना लॉकडाऊन आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे आता हळूहळू ओसरत असल्याचे दिसत आहे.

मुरूम शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास असून, शहरात आठ प्रभाग आहेत. शहरातील यशवंतनगर भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कडक लॉकडाऊनच्या काळातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या शुक्रवारपर्यंत २५९ वर पोहोचली आहे. यात उपचारानंतर २४४ लोकांनी कोरोनाला हरवले असून, १२ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील तीनच रुग्ण उपचाराखाली आहेत. लॉकडाऊन आणि शासनाच्या योग्य उपाययोजना यांमुळे १५ जूननंतर कोरोनाचा वेग मंदावला आहे. कोरोना ओसरल्याने सरकारने अनलॉक सुरू केले आहे. अनलॉकमुळे मागील चार महिन्यांपासून बंद असलेले उद्योगधंद्दे पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने रस्त्यांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागात असणारे सर्व व्यवसाय व दुकाने सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. अनलॉकमध्येही शासनाने अटी, शर्तींसह दुकाने उघडण्यास व व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बंद पडलेले उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्याने रस्त्यावरील गर्दीदेखील वाढली आहे.

सध्या कोरोना ओसरला असला तरी तज्ज्ञांच्या मते अद्यापही तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वत:सह कुटुंबांचेही लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. परंतु, लसीबाबत नागरिकांमध्ये अद्यापही समज-गैरसमज कायम असल्याने आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचाही वेग मंदावला आहे. आतापर्यंत मुरूम ग्रामीण रुग्णालयात सहा हजार २५८ जणांनी लसीकरण करून घेतले आहे. दरम्यान, शहरातील कोविड सेंटरमध्ये सध्या केवळ सातच रुग्ण उपचाराखाली असून, उपचारानंतर शहरातील २४४ जणांनी दुसऱ्या लाटेत कोरोनाला हरविले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे आणि पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी दिली.

Web Title: Corona slowed down in rural areas, including the city of Murum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.