उमरगा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. याचा मोठा फटका कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात उभारण्यात आलेल्या १२ मंगल कार्यालयांना देखील बसला असून, ही कार्यालये अक्षरश: धूळखात पडल्याने याचे मालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लाॅकडाऊन काळात शासनाने मंगल कार्यालयावर संपूर्णतः बंदी घातली. यामुळे मागील दीड वर्षात सर्वच मंगल कार्यालय मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन काळात उत्पन्न नसतानाही बँकेचे व्याज मात्र चालूच असल्याने मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अनलॉक प्रक्रियेमध्ये सध्या हाॅलमध्ये १०० व मैदानात २०० लोकांना परवानगी देण्यात आली. परंतु, काही कार्यालय मोठे असतात व यात फक्त १०० लोक म्हटले की, लोक कार्यालयात लग्न करणे टाळतात. यामुळे या कार्यालय मालकांसोबतच बॅन्ड, डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम, मेहंदी, मंडप, केटरिंग, डीजे साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे हजारो लोक देखील प्रभावित होऊन अडचणीत सापडले आहेत.
कोरोनामुळे उदभवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी जे उपाय लाॅकडाऊन काळात शासनाने सुचवले त्यात मंगल कार्यालयावर संपूर्णतः बंदी घालण्यात आली. यामुळे मागील दोन वर्षे संपूर्ण लग्नसराईत एकही लग्न न करता मंगल कार्यालय मालकांना काढावी लागली. बँकेचे व्याज वाढत आहे. शासनाने मंगल कार्यालयाच्या ५० टक्के क्षमतेने लग्न करण्यास परवानगी द्यावी. तरच हा व्यवसाय थोडाफार पूर्वपदावर येईल.
- ओम माने, मंगल कार्यालय मालक, उमरगा
दीड वर्षांपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व लॉन मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने सध्या २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न करायला परवानगी दिली आहे. मात्र मोठ्या मंगल कार्यालयासाठी ५० टक्के उपस्थितीला मान्यता देण्याची गरज आहे. असे केले तर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्य पार पाडली जातील.
- ओंकार जाधव, लॉन्स मालक, उमरगा
गेल्या दीड वर्षांपासून लग्न व विविध कार्यावर बंदी आहे. यामुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. इतर कोणताही व्यवसाय नसल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. लग्नाच्या तारखा नोव्हेंबर, डिसेंबर, एप्रिल, मे महिन्यात असतात. या कमाईवर वर्षभर घरखर्च भागवला जातो.
- मनिष सोनी, फोटोग्राफर, उमरगा
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे लग्न समारंभ बंद आहेत. आमच्या बँड पथकात १८ कलाकार आहेत. या सर्वांच्या कुटुंबाचे पालन पोषण बँड व्यवसायावर चालते. कलाकारांना सांभाळताना आता आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याही बाबीचा विचार करुन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
- किशोर माने, बँडचालक, उमरगा
लॉकडाऊन काळामध्ये कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याच्या अटीमुळे विवाह कार्यामध्ये सर्व काम करणारे पुरोहित, फूलवाले, घोडेवाले, स्वयंपाकी, मंडप, बँडवाले यांचे फार मोठे नुकसान झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- अशोक जोशी, पुरोहित, मुळज