मुरूम - शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच उमरगा तालुक्यातील चार प्राथमिक आराेग्य केंद्रांत शुक्रवारी रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. या माध्यमातून शहरामध्ये एकही रुग्ण आढळून आला नसला, तरी ग्रामीण भागात नवीन आठ रुग्णांची भर पडली आहे.
काेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी निर्बंध अधिक कठाेर केले आहेत. त्याचे परिणाम हळूहळू का हाेईना दिसून येऊ लागले आहेत. शुक्रवारी मुरूम शहरातील ग्रामीण रुग्णालयासाेबतच ग्रामीण भागातील चार आराेग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यानुसार शहरी भागात एकाही नवीन रुग्णांची भर पडली नाही. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागात जवळपास आठ नवीन रुग्णांची भर पडली आहे. परिणामी शहरातील बाधितांची संख्या २०४ वर स्थिरावली आहे. आजवर १४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात बेळंब, केसर जवळगा, भुसणी, आलूर, काटेवाडी, कोथळी, मुरुम या गावांतील २६ कोरोना संशयित व संपर्कातील नागरिकांची ॲन्टिजन चाचणी केली आली. यापैकी आलूर, केसरजवळगा, काटेवाडी, भुसणी या चार गावांत प्रत्येकी एक असे चार रुग्ण नव्याने आढळून आले; तर उमरगा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत येणाऱ्या गुंजोटी, तलमोड, नाईचाकूर, येणेगूर, तुगाव या पाच गावांतील २१ जणांची ॲन्टिजन केली. यामध्ये गुंजोटी दोन, तर येणेगूर व तुगाव येथे प्रत्येकी एक असे चार रुग्ण आढळून आले. मुरुमच्या कोविड सेंटरमध्ये सध्या ६१ जणांवर उपचार सुरू असून, उपचारानंतर बरे झालेल्या चारजणांना घरी सोडण्यात आले. सहा गंभीर रुग्णांवर मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.