साखर कारखान्यांतून होणार सीएनजीची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:54+5:302021-08-18T04:38:54+5:30
कळंब (जि.उस्मानाबाद) : उसापासून साखर, इथेनॉल अन् मद्यार्क निर्मितीचा प्रवास आजवर मराठवाड्याने अनुभवला. मात्र, आता याच उसाच्या उदरातून बायो ...

साखर कारखान्यांतून होणार सीएनजीची निर्मिती
कळंब (जि.उस्मानाबाद) : उसापासून साखर, इथेनॉल अन् मद्यार्क निर्मितीचा प्रवास आजवर मराठवाड्याने अनुभवला. मात्र, आता याच उसाच्या उदरातून बायो सीएनजीचे अपत्य जन्माला घालण्याचा प्रयोग रांजणीच्या माळावरील नॅचरल शुगरने हाती घेतला आहे. येत्या दिवाळीपर्यंत केवळ प्रकल्पच नव्हे तर इंधनही वापरास तयार राहील, या दिशेने पावले टाकली जात आहेत. उसापासून पर्यावरणपूरक जैव इंधन निर्मिती करणारा नॅचरल हा मराठवाड्यातील किंबहुना राज्यातीलही पहिलाच कारखाना ठरणार आहे.
उस्मानाबाद अन् लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील रांजणीच्या माळावर कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी नॅचरल शुगरच्या माध्यमातून साखर कारखाना उभा केला. सातत्याने नवनिर्मितीत गुंतलेल्या ठोंबरे यांनी केवळ साखरेवर न थांबता इथेनॉल, सहवीज, डिस्टीलरी असे प्रकल्प उभे करुन उसाचा चोथाही सोडला नाही. आता त्याहीपुढे जाऊन याच कारखान्याच्या माध्यमातून बायो एनर्जी क्षेत्रात पाऊल टाकले आहे. उसापासून बायो सीएनजी हे इंधन तयार करण्याचा प्रकल्प नॅचरलने हाती घेतला असून, नुकतीच त्याची पायाभरणीही झाली. प्रकल्प गतीने पूर्ण करून येत्या दिवाळीतच या इंधनाची भेट सभासदांना देण्याचा मानस ठोंबरे यांनी बोलून दाखविला.
शुगर केन नव्हे एनर्जी केन...
भविष्यातील प्रदूषणमुक्त भारतामधील जैव इंधनाची गरज पाहता साखर कारखान्यातील टाकाऊ पदार्थांचा या इंधन निर्मितीसाठी वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. यापूर्वी उसापासून साखर पाहिली. याशिवाय मोलेसीस, डिस्टिलरी, इथेनॉल, सहवीजनिर्मिती असे इतर प्रॉडक्ट साखर उद्योगातून निर्मित झाले. यापुढे ऊस हा साखर निर्मितीशिवाय जैव इंधन निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत ते मुख्य साधन बनू शकेल, असे बी. बी. ठोंबरे म्हणाले.
सभासदांचा ट्रॅक्टर सीएनजीवर धावेल...
आगामी चार महिन्यांमध्ये ‘नॅचरल बायो सीएनजी’ प्रकल्पाची उभारणी होणार असून येत्या दिवाळीमध्ये हे इंधन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातून उत्पादित बायो सीएनजी सभासदांच्या ट्रॅक्टरला इंधन म्हणून प्राधान्याने देण्यात येणार असल्याने डिझेलच्या तुलनेत इंधनाची पन्नास टक्के बचत होईल तसेच खर्चातही बचत होईल, असे ठोंबरे यांनी सांगितले.