कळंबमध्ये उभारणार शेतीमाल प्रक्रिया उद्यागोचे क्लस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST2021-01-15T04:27:38+5:302021-01-15T04:27:38+5:30
(फोटो : बालाजी आडसूळ १४) कळंब : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व शेती क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक ...

कळंबमध्ये उभारणार शेतीमाल प्रक्रिया उद्यागोचे क्लस्टर
(फोटो : बालाजी आडसूळ १४)
कळंब : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व शेती क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कळंब तालुक्यात शेतीमाल प्रक्रिया उद्यागोचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने आंदोरा येथे या कंपन्याच्या संचालकांची नुकतीच बैठक पार पडली.
शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी शासन काही धोरणात्मक योजना राबवत आहे. यात समुह पद्धतीने शेती करणे, पिकपद्धतीत बदल व यात समुह तत्त्वाचा अवलंब करणे,प्रक्रिया उद्योग वाढवणे, याच्या उभारणीत शेतकर्यांचा एक मालक म्हणून सहभाग नोंदवणे यावर भर दिला जात आहे. याच उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातून कळंब तालुक्यातील विविध गावात शेतकऱ्यांनी एकत्र अशा कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या संचालकांची बैठक आंदोरा येथे पार पडली. यावेळी यासंदर्भात नाबार्डच्या सहयोगाने रचनात्मक कार्य करणाऱ्या सहकारी विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक तथा महा ॲग्रो एफपीओ फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विजय गोफणे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. उस्मानाबाद येथील आत्माचे नेताजी चव्हाण, येडाई शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. संदीप तांबारे व तालुक्यातील पंधरा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. यावेळी श्री गोफणे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, यामधील व्यवसाय संधी याविषयी मार्गदर्शन केले तर नेताजी चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजना, अटी व नियम याविषयी माहिती दिली.
चौकट....
शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे क्लस्टर
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती व शेतकरी विकासाचा प्रयत्न करताना ‘क्लस्टर’ निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. याचा त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. यातूनच कळंब तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे ‘क्लस्टर’ उभा करण्यात येणार आहे असे डॉ. संदीप तांबारे, विजय गोफणे यांनी यावेळी सांगितले.