मुरुम : शहरात कोरोनाच्या दोन्ही लाटांत मिळून ४५९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यात आतापर्यंत ४४७ जणांनी कोरोनाला उपचारानंतर यशस्वीपणे हरवले असून, आतापर्यंत १७ जणांचा या आजाराने बळी गेला आहे. शहरातील सध्या एकच रुग्ण सोलापूर येथे उपचार घेत असल्याने, शहराची वाटचाल सध्या कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. दरम्यान, मुरुम ग्रामीण रुग्णालयात सोमवारपर्यंत ११ हजार २४४ जणांनी लस टोचून घेतली आहे.
मुरुम शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास असून, शहरात आठ प्रभाग आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुरुम शहरात १० जुलै, २०२० रोजी पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर, शहरात रुग्ण संख्या वाढून १९८ झाली. पहिल्या लाटेत तीन जणांचा या आजाराने मृत्यू झाला. उर्वरित १९५ लोकांनी कोरोनावर मात केली, तर दुसऱ्या लाटेची सुरुवात शहरात ४ मार्च, २०२१ पासून होऊन या लाटेत २६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. १४ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या व मृत्युदरही दुसऱ्या लाटेत वाढला होता. दुसऱ्या लाटेत उपचारानंतर २४७ जणांनी कोरोनाला यशस्वीपणे हरवले आहे. जून महिन्यापर्यंत शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७ होती, तर दोघांचा या आजाराने मृत्यू झाला होता. संपूर्ण जुलै महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या निरंक होती. शहरात एकही रुग्ण नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्यात शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. शहरातील सिद्धार्थ कॉलनी येथे दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील एकावर सोलापूर येथे सध्या उपचार सुरू आहेत. दुसऱ्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
चौकट.....शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी असली, तरी शहरवासीयांनी गाफील राहू नये. कोरोनाचे नियम पाळून स्वतःसह शहरालाही कोरोनापासून दूर ठेवावे. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही. शहरावर तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे शहरवासीयांनी स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाचे नियम पाळावेत, तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजीत डुकरे यांनी केले आहे.