प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेकडे नागरिकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:33+5:302021-06-27T04:21:33+5:30
कळंब : येथे नागरिकांच्या उदासीनतेमुळे प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ज्यांनी ही मोहीम राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडे आग्रह धरला ...

प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेकडे नागरिकांची पाठ
कळंब : येथे नागरिकांच्या उदासीनतेमुळे प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ज्यांनी ही मोहीम राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडे आग्रह धरला त्यांनीही या मोहिमेला गांभीर्याने न घेतल्याने या मोहिमेचा उद्देश सफल झाला नसल्याचे समोर आले आहे.
या मोहिमेमध्ये नियोजित दिवशी दोनशे नागरिकांना डोस देण्यात येणार होते. ४५ वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला, तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना या मोहिमेंतर्गत लस दिली जाणार होती, तसेच यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट ठेवण्यात आली नव्हती.
कळंब शहरात एकच लसीकरण केंद्र कार्यान्वित असल्याने प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेमुळे जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर त्या-त्या प्रभागातील पात्र नागरिकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
१८ ते २४ जूनपर्यंत शहरातील चोंदे गल्ली, विठ्ठल मंदिर, साठेनगर, गांधीनगर, पुनर्वसन सावरगाव, न. प. वाचनालय, मोहा रोड या भागातील नागरिकांसाठी ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सोळाशे नागरिकांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट होते. मात्र, १८ जूनला ६३, १९ जूनला ४३, २० रोजी २९, २१ रोजी १९, २२ रोजी ३८, २३ जूनला ३८, तर २४ जून रोजी एका केंद्रावर ४०, तर दुसऱ्या केंद्रावर ४१ अशा एकूण फक्त ३११ जणांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजे, उद्दिष्टाच्या २० टक्केच लसीकरण करण्यात आले.
यामध्ये चोंदे गल्ली भागातील लसीकरण केंद्रावर सर्वांत जास्त म्हणजे ६३, तर गांधीनगर भागात सर्वांत कमी म्हणजे १९ जणांचे लसीकरण करण्यात आले.
चौकट -
कधी कळणार गांभीर्य?
शहरातील काही मंडळींनी आरोग्य विभागाकडे पत्र देऊन प्रभागनिहाय लसीकरण मोहीम मंजूर करून आणल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या मागणीला मान देऊन आरोग्य विभागाने त्याचे नियोजनही केले. मात्र, नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी कोणीही पुढाकार घेतल्याचे दिसले नाही. त्या-त्या प्रभागातील नागरिकांनीही ही मोहीम गांभीर्याने घेतली नसल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसते आहे.
चौकट -
कोरोनाचा धोका संपला नाही
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी संसर्गाचा धोका कायम आहे. मास्क वापर, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे याबरोबरच लस घेणेही अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होते. प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेत अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. नियमित लसीकरण केंद्रावर लस घेऊन नागरिकांनी स्वतःला सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी केले.