मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:50+5:302021-03-20T04:31:50+5:30
उस्मानाबाद : मार्च महिन्याच्या मध्यानंतर गृहिणींची वर्षभराकरिता मसाला बनविण्याची तयारी सुरू होते. याकाळात लाल मिरची तसेच गरम मसाल्याच्या जिन्नसांना ...

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका
उस्मानाबाद : मार्च महिन्याच्या मध्यानंतर गृहिणींची वर्षभराकरिता मसाला बनविण्याची तयारी सुरू होते. याकाळात लाल मिरची तसेच गरम मसाल्याच्या जिन्नसांना मोठी मागणी असते. दरम्यान इंधनाचे दर वाढत असल्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढत आहे. यामुळे यंदा बेडगी, तेजा मिरचीचे दर वाढत आहेत. तसेच खोबरे, धने यासारखे जिन्नसही महागले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडत आहेत.
मार्च ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ तिखट, मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे मार्च ते एप्रिल या महिन्यात मोठ्या प्रमाणावर गृहिणी मिरची, तसेच धने, जिरे, खसखस, खोबर, मेथी, हळद, लवंग खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत असतात. त्यामुळे उन्हाच्या तोंडावर मिरची व मसाल्यांच्या दरात वाढ होते. बाजारात सध्या बेडगी, तेजा या मिरचीस मागणी आहे. बेडगी मिरची २८० ते ३२० रुपये किलो, तेजा १६० ते १७० रुपये, गुंटूर १५० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहे. लॉकडाऊनपासून तेजाचा दर चढाच असून, गुंटूर मिरचीला जिल्ह्यात मागणी नसल्याने या मिरचीचे दर उतरले आहेत. तर बेडगीच्या दरातही १० ते १५ टक्यांनी वाढ झाली. धने, खोबर, जिरे, तिळाचे दरही फेब्रुवारी महिन्यापासून वाढल्याचे मसाला व्यावसायिक सतीश अंबुरे यांनी सांगितले.
मिरचीचे दर प्रति किलो
बेडगी लाल ३१०
बेडगी चॉकलेटी २८०
तेजा १७०
गुंटूर १६०
मसाल्याचे दर प्रतिकिलो
धने १००
जिरे १७०
तीळ १२५
खसखस १२००
खोबर १८०
मेथी ८०
हळद ११५
मोहरी ७५
लवंग १५
चक्रीफूल १५
रामपत्री १५
धोंडफूल ६
तेजपत्ता २
बेडीशेप २
वेलदोडे ३०
दरफल बदाम ३ रुपये
नाकेश्वर २०
चिफळ १०
मिरची येते आध्रातून
गुंटूर मिरची आंध्रप्रदेश राज्यातून सोलापूर, लातूर येथील बाजारपेठेत दाखल होती. या ठिकाणाहून उस्मानाबाद येथील बाजारात गुंटूर मिरची दाखल होते.
तेजा मिरची स्थानिक तसेच राज्यातील विविध भागातून विक्रीस येत असते. ही मिरची अधिक तिखट असल्याने मिरचीला मागणी आहे.
बेडगी मिरची कर्नाटक,हवेरी येथून बाजारात येते. बेडगी मिरचीतही लाल व चॉकलेटी असा प्रकार आहे. अधिक नागरिक बेडगी मिरची तिखटपणाऐवजी खाद्यपदार्थांच्या रंगासाठी वापरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या गुंटूर मिरचीस भाव नसल्याने या मिरचीचा दर उतरला आहे. तर खोबर हे कोकणातून बाजारात दाखल होत आहे. खोबऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे.
गृहिणी म्हणतात...
मार्च महिन्यापासून उन्हाळी कामे सुरु केली जातात. एप्रिल महिन्यात चटणी, लोंणचे, पापड बनविण्यासाठी मिरची, मसाल्यांची खरेदी करावी लागत आहे. मात्र, आता खाद्यतेलापाठोपाठ मिरचीही महागली आहे. शिवाय, मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कसरत करावी लागत आहे.
शुभांगी मुंडे, गृहिणी, उस्मानाबाद
वर्षभरासाठी लालतिखट, काळे तिखट बनविले जाते. शिवाय, लोंणचेही करुन ठेवण्यात येते. त्यासाठी लाल मिरची, मसाला खरेदी करायचा आहे. मात्र, बाजारात मागील महिन्यापासून मिरची व मसाल्याच्या दरामध्ये वाढ होत आहे.
मनिषा झालटे, उस्मानाबाद