केंद्राच्या आयात धोरणाने जातोय शेतकऱ्यांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:59+5:302021-09-23T04:36:59+5:30
उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच सोयाबीनचे दर सध्या कोसळू लागले आहेत. केंद्र सरकारने १२ लाख टन ...

केंद्राच्या आयात धोरणाने जातोय शेतकऱ्यांचा बळी
उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच सोयाबीनचे दर सध्या कोसळू लागले आहेत. केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचा दावा करीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केंद्रावर निशाणा साधला.
मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करीत असल्यामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचे खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे. सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी दहा ते अकरा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत. एकीकडे यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. एकरी उतारा घटल्याने अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दराच्या घसरणीचाही तोटा सहन करावा लागत आहे. सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावून घेतल्याचे खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे. बराच काळ चढे दर असताना जेव्हा केंद्राने आयातीचा विचार सुरु केला तेव्हापासून दर घसरणीला लागले. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. यास पूर्णपणे केंद्र सरकार व त्यांचे धोरण जबाबदार असल्याचा दावाही खा. ओमराजे निंबाळकर यांनी केला.