रानडुकरांचा धुमाकूळ, ज्वारी पिकाचे माेठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST2021-01-16T04:36:38+5:302021-01-16T04:36:38+5:30
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा तडाखा सहन केल्यानंतर रब्बी हंगामाच्या पेरण्यांची तयारी केली. ...

रानडुकरांचा धुमाकूळ, ज्वारी पिकाचे माेठे नुकसान
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा तडाखा सहन केल्यानंतर रब्बी हंगामाच्या पेरण्यांची तयारी केली. अनेक संकटांवर मात करीत पेरणी केलेल्या ज्वारी पिकात सध्या रानडुकरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्वारीचे माेठे नुकसान हाेत आहे.
ऑक्टोबर महिन्यात भेडसावलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा सावरलेल्या बळीराजाने रब्बी हंगामाची पेरणी केली. यंदा ज्वारी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या ज्वारीचे पीक पोटऱ्यात आले आहे. पिकातून जोमदार कणसे बाहेर पडत असताना रानडुकरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. सांगवी शिवारात अडीच एकरावरील शंकर मगर, बाळासाहेब मगर यांची ज्वारी फस्त केली. रात्रीच्या वेळी रानडुकरांना शेतकरी हुसकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, रानडुकरांकडून प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न हाेताे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त ज्वारीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
चाैकट...
सांगवी, पिंपळा खुर्द, धोत्री, पिंपळा (बु.) शिवारात रानडुकरांचा वावर अधिक वाढला आहे. वनविभागाच्या संरक्षित वनक्षेत्र व गंगेवाडी अभयारण्यात रानडुक्कर विसाव्याला थांबतात.