मांजरा पट्टा सावरत नाही तोच तेरणा पट्ट्यात ढगफुटीची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:51+5:302021-09-26T04:35:51+5:30
कळंब : ऐन काढणी हंगामात पावसाचे ‘कमबॅक’ झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाचे आतोनात नुकसान झाले. गुरुवारी रात्री मांजरा तर शुक्रवारी ...

मांजरा पट्टा सावरत नाही तोच तेरणा पट्ट्यात ढगफुटीची अनुभूती
कळंब : ऐन काढणी हंगामात पावसाचे ‘कमबॅक’ झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाचे आतोनात नुकसान झाले. गुरुवारी रात्री मांजरा तर शुक्रवारी मध्यरात्री तेरणा पात्रात पावसाने कहर केला. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात तरंगत आहेत. नदीकाठच्या उभ्या पिकातून पाणी वाहत असून, तर इतर ठिकाणच्या क्षेत्रावर ‘चिबड’ लागले आहे. कुठे घराची पडझड तर कुठे रस्ते बंद झाले होते. यासंबंधी ‘लोकमत’ने घेतलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.
मंगळवार, बुधवार व गुरुवार असा सलग तीन दिवस मांजरा नदीच्या पट्ट्यात पाऊस झाला. यातच लगतच्या बीड, केज, वाशी, भूम व पाटोदा या मांजराच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात पाऊस झाल्याने मांजरामाय पोटोपोट वाहू लागली. यातच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बॅकवॉटरला पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. यामुळे मांजरा नदीच्या तिरावरील बहुला, आढळा, सात्रा, खोंदला, भाटसांगवी, कळंब, खडकी या शिवारातील नदीकाठच्या जमिनीतील उभी पिके पाण्याखाली गेली. याशिवाय बॅकवॉटरच्या लोहटा पूर्व, पश्चिम, करंजकल्ला, हिंगणगाव, कोथळा, खडकी, कळंब, दाभा येथील शेतीस फटका बसला. लाभक्षेत्रातील आवाड शिरपुरा येथे तर शेकडो एकर उसाच्या फडातून पाणी वाहत होते. जुन्या व नव्या गावाचा पुलावरील पाण्यामुळे संपर्क तुटला होता.
यापाठोपाठ येरमाळा भागात शुक्रवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. पुढे तीन तास मोठा पाऊस झाला. या पावसाची तब्बल १०२ मिलिमीटर एवढी नोंद झाली. या वर्षातील या भागातील हा सर्वात मोठा पाऊस होता. यामुळे तेरणा नदीला मोठा पूर आला होता. हा पाऊस येरमाळ्यासह तेरणाकाठच्या मोहा, मस्सा महसूल मंडळातील गावातही बरसला आहे.
दरम्यान, मांजरा, तेरणा नदीकाठच्या भागासह तालुक्यातील इटकूर, मोहा, शिराढोण, खामसवाडी, गोविंदपूर, नाय, वाठवडा भागातही पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात गेले आहेत. गावोगावी शेतकरी प्रशासनाला मदतीची साद घालत आहेत.
तलाठी, कृषी सहायकांचा नाही पत्ता..
मांजरा काठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही नुकसान पाहण्यास तलाठी व कृषी सहायक काही गावात फिरकले नसल्याचे चित्र आहे. बहुला येथेही तलाठी आले नव्हते. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ईटकूर येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार रोहण शिंदे, तलाठी प्रवीण पालखे यांनी पाहणी केली.
केलेले कष्ट अतिवृष्टीत स्वाहा...
येरमाळा, रत्नापूर, शेलगाव दिवाने, शेलगाव (ज), संजितपूर, सापनाई, दहिफळ, गौर, सातेफळ, सौंदना, एरंडगाव आदी सर्व गावात पावसाने कहर केला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे फड पाण्यात गेले. कष्टाने पिकवलेले पिवळे सोने पाण्यात मातीमोल झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना शनिवारी घास गोड लागला नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारी ही अपरिमित हानी डोळ्याने बघवणारी नव्हती.