तुळजापूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन करून वाहतूक व्यवस्थाही बंद केली होती. याचा फटका एसटी महामंडळाच्या बसलाही बसला. शिवाय, या बसवर अवलंबून असणाऱ्या खारेमुरे, चिप्स, पाणी बॉटल, फुटाणे, शेंगदाणे विक्री करणारे फेरीवाले, दुकानदार यांनाही फटका बसला आहे. आता प्रशासनाने अनलॉक केले असून, बससेवाही सुरळीत होत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांच्या संसाराची गाडी देखील हळूहळू रुळावर येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, श्री तुळजाभवानी उघडल्यास व्यवसायाच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार असल्याच्या प्रतिक्रिया या व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहेत. तुळजापूर येथे दोन बसस्थानके असून, या दोन्ही ठिकाणी विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. काहीजण फिरून व्यवसाय करतात. पहाटे ते सायंकाळपर्यंत या व्यावसायिकांचे व्यवसाय सुरू असतात.
कोरोनाकाळात बससेवा बंद होती. त्यामुळे व्यवसायही ठप्प झाला होता. यातून आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या काळात शेतीमध्ये कामे केली. आता अनलॉक झाल्याने बस प्रवासही सुरळीत होऊ लागल्याने व्यवसायाला हळूहळू गती येत आहे.
- बालाजी बोडगिरे, व्यावसायिक
कोरोनामुळे काही महिने बससेवा बंद होती. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. आता बससेवा सुरू झाल्याने दिवसाला दीड-दोनशे रुपये मिळतात. व्यवसाय पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरही बंद असल्याने प्रवासी संख्या म्हणावी तशी नाही.
- महादेव टिंगळे, फेरीवाले
पाणी बॉटल, चक्की, बिस्कीट विक्री करून संसाराचा गाडा चालवला जातो. सध्याच्या स्थितीत दिवसाकाठी १०० ते १५० रुपये मिळतात; परंतु बंद काळात एवढे सुद्धा मिळत नव्हते. कोरोनामुळे आर्थिक अडचणीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले आहे.
- संजय राठोड, फेरीवाले
तुळजापूर बसस्थानकात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दरमहा भाडे द्यावे लागते. यामध्ये फेरीवाले यांना महिन्याकाठी पाचशे रुपये तर महामंडळाच्या गाळेधारकांना याहीपेक्षा जादा भाडे द्यावे महामंडळाकडे भरावे लागते.
तुळजापूर स्थानकातून रोज सुटणाऱ्या बस
६५
स्थानकातील विक्रेते
१३