थोरलीवाडी : पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
उमरगा (जि. उस्मानाबाद) : जुन्या भांडणाचा राग आणि दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून १५ जणांनी संगनमत करून दोघांना काठी व कुऱ्हाडीने बेदम मारहाण केली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातीत थोरलीवाडी गावात घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, थोरलीवाडी येथे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बालाजी गुंडाप्पा मिसाले, रणजित भिमसू मेकाले, मुंडाप्पा बाबू एपाळे, सायबन्ना भानुदास चिंचोळे, सायबन्ना शिवाजी खवडे, वसंत ईश्वर कोराळे आदी ग्रामपंचायतीसमोर बसले होते. याचवेळी गोविंद गोपाळ कोराळे यांनी येथे येऊन महादेव गाेपिचंद खवडे यांनी माझ्या दुचाकीला कट मारला आहे, असे सांगितले. त्यावर तेथील लाेकांनी गाेविंदची समजूत काढत, त्याच्या वडिलांना जावून सांग. असे म्हटले. यानंतर गाेविंदने गाेपिचंद यांच्याकडे जावून तुमच्या मुलाने माझ्या दुचाकीला कट मारला आहे, अशी तक्रार त्यांच्याकडे केली. याचवेळी तेथे महादेव खवडे व त्यांचा चुलतभाऊ रायाप्पा पांडुरंग खवडे तेथे आले. महादेवच्या हातात काठी तर रायाप्पा याच्या हातात कुऱ्हाड होती. या दोघांनी गोविंदच्या दिशेने जात तुझा जीवच घेतो, असे म्हणून रायाप्पाने हातातील कुऱ्हाडीने गोविंद कोराळे यांच्या डोक्यात घाव घातला. तर महादेव याने हातातील काठीने गोविंदच्या पाठीवर मारले. त्यामुळे गोविंद कोराळे हे जमिनीवर काेसळले. यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. या थरारानंतर जिवे मारण्याची धमकी देत महादेव खवडे व रायाप्पा खवडे हे दोघे अंगणवाडीकडे निघून गेले. या ठिकाणी त्यांनी आपल्या साथीदारांना बाेलावून हणमंत परसराम व रायाप्पा हणमंत कोराळे यांच्या दाेघांत जागेच्या कारणावरून झालेल्या वादाचा मुद्दा उपस्थित केला आणि हणमंत यास महादेव गोपिचंद खवडे, रायाप्पा पांडुरंग खवडे, भीम नरसाप्पा खवडे, लिंबाजी व्यंकट चंडकापुरे, नागनाथ सायबन्ना कोराळे, भरत पापू खवडे, रूपचंद भद्रीनाथ कोराळे, रामदास हुसेनी खवडे, नागनाथ रावजी व्हनाळे, गोपिंचद भद्रीनाथ कोराळे, सायबन्ना सुधाकर एंपाळे, विजय रघुनाथ दापेगावे, अंबक तुकाराम खवडे, रायाप्पा हणमंत कोराळे, लक्ष्मण हुसेनी खवडे (सर्व रा. थोरलीवाडी ता. उमरगा) यांनी कुऱ्हाड, तलवार व काठ्याने मारहाण केली. यात हणमंत गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उमरगा पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी हणमंत परसराम व गाेविंद काेराळे यांना उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, हणमंत यांना मयत घाेषित केले. तर गंभीर जखमी गाेविंद यांना शहरातीलच खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. याप्रकरणी बालाजी गुंडाप्पा मिसाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांविरूद्ध रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. अधिक तपास पाेनि मुकुंद आघाव हे करीत आहेत.