आघाडी सरकार विरोधात भाजप उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:34+5:302021-09-15T04:38:34+5:30
उस्मानाबाद : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविले आहे. या सरकारने ओबीसी प्रवर्गातील समाजाचा घोर अपमान ...

आघाडी सरकार विरोधात भाजप उतरणार रस्त्यावर
उस्मानाबाद : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविले आहे. या सरकारने ओबीसी प्रवर्गातील समाजाचा घोर अपमान करून विश्वासघात केला आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्यावतीने मंगळवारी येथील प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काळे यांनी सांगितले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आघाडी सरकारने वकील दिला नसल्याचा आरोप केला आहे. आघाडीचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले पाहिजे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आक्षणाशिवाय नको, अशी भाजपाची भूमिका आहे. राज्यातील आघाडी सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविता आलेले नाही. त्यामुळे भाजपाच्यावतीने जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी सरकारचा निषेध नोंदवून निदर्शने केली जाणार आहेत. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, ॲड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, सुनील काकडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, इंद्रजित देवकते, पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.