भाजपला प्रथमच नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:34+5:302021-09-14T04:38:34+5:30
उमरगा : उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना राज्य सरकारने बडतर्फ केल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाचा कार्यभार नियमानुसार पालिकेतील भाजपचे ...

भाजपला प्रथमच नगराध्यक्ष
उमरगा : उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना राज्य सरकारने बडतर्फ केल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाचा कार्यभार नियमानुसार पालिकेतील भाजपचे उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. उमरगा पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला असून, सोमवारी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना नगरविकास खात्याने बडतर्फ केल्यानंतर रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार नियमाप्रमाणे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी उपाध्यक्ष हंसराज गायकवाड यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा परिषदेचे सभापती ॲड. अभय चालुक्य, डॉ. कपिल महाजन, माधव पवार, शहाजी पाटील, आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते संजय पवार, शिवसेनेचे गटनेते संतोष सगर, नगरसेवक राजश्री चव्हाण, अरुण इगवे, इराप्पा घोडके, गोविंद घोडके, उमेश स्वामी आदीसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालिकेतील सत्ताधारी भाजपसह विरोधी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनीदेखील नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. भाजपच्या या धोरणामुळे गेल्या वर्षभरापासून काँग्रेस व भाजपमध्ये दुरावा आला होता. नगरविकास मंत्र्यांनी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना बडतर्फ केल्यानंतर उपनगराध्यक्ष असलेल्या भाजपच्या हंसराज गायकवाड यांच्याकडे प्रभार नियमानुसार आला आहे. यावेळी काँग्रेस वगळता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आवर्जून उपस्थित होते. विशेषतः राष्ट्रवादीचे गटनेते संजय पवार यांनी पद्ग्रहण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.