धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:50 IST2025-02-28T19:50:21+5:302025-02-28T19:50:34+5:30
ढोकीतील एका मांस विक्रेता तापीने फणफणला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू
धाराशिव : तालुक्यातील ढोकी येथे कावळ्यांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्ल्यू आजार उघडकीस आला. मागील काही दिवसांपासून सातत्याने मृत कावळे आढळून येत आहेत. सध्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरू असतानाच ढोकीतील एका मांस विक्रेता तापीने फणफणला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बर्ड फ्ल्यूचा संशय असल्याने आरोग्य विभागाने गुरुवारी सायंकाळी या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेतला आहे.
ढोकी गावातील पोलिस ठाणे परिसरात २१ फेब्रुवारीला काही कावळे मृतावस्थेत पडलेले पहिल्यांदा आढळून आले होते. पशुसंवर्धन विभागाने यातील दोन कावळे तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले. २४ फेब्रुवारीला प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालातून कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ढोकी गावच्या १० किमी परिघातील परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. सध्या या परिसरातील सुमारे १० कोंबड्यांचे सर्वेक्षण पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.
एकीकडे या उपाययोजना केल्या जात असतानाच ढोकी गावातील एक मांस विक्रेता २५ फेब्रुवारीला धाराशिव शहरातील एका खाजगी रुग्णालयात ताप कमी होत नसल्याने दाखल झाला आहे. ताप सतत चढ-उतार होत असल्याने डॉक्टरांनी या व्यक्तीस आवश्यक ती काळजी घेत रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु केले आहेत. मात्र, पक्षातील साथ लक्षात घेत त्यांना संशय आल्याने त्यांनी आरोग्य विभागास याबाबतची माहिती तातडीने दिली. याअनुषंगाने गुरुवारी सायंकाळी या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला असून. तो तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायराॅलॉजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीही धाकधूक वाढली आहे.
ढोकी गावातील पक्ष्यांमधील बर्ड फ्ल्यूची साथ लक्षात घेता आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. या भागातील आजारी नागरिकांचीही माहिती घेतली जात आहे. खासगी रुग्णालयात दाखल रुग्ण संशयित असल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला जात असून, जिल्ह्यातील सर्वच आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.
- डॉ.सतीश हरदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव.