नळदुर्ग येथील भुईकाेट किल्ल्याची पर्यटकांना भुरळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:21+5:302021-09-27T04:35:21+5:30
पांडुरंग पाेळे नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : ऐतिहासिक स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा व पर्यटकांना भुरळ घालणारा येथील भुईकोट किल्ला हा ...

नळदुर्ग येथील भुईकाेट किल्ल्याची पर्यटकांना भुरळ...
पांडुरंग पाेळे
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : ऐतिहासिक स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा व पर्यटकांना भुरळ घालणारा येथील भुईकोट किल्ला हा जोड किल्ला आहे. १२६ एकर क्षेत्रावर बालाघाट डोंगर रांगांच्या माथ्यावर अन् बोरी नदीच्या पात्रालगत हा किल्ला वसलेला आहे. इ. स. १३५१ ते १४४० दरम्यान बहमनी यांच्या काळात हा किल्ला बांधला गेला. या किल्ल्याने अनेक रक्तरंजित क्रांती, राजकीय उलथापालथी व आक्रमणे पाहिलेली आहेत. तलवारीचा खणखणाट, तोफांचा कर्णभेदी आवाज व वीरांचे साहस अशा चित्तथरारक घटनाही या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या निसर्गाच्या सानिध्यात व डोंगरमाथ्यावर असला तरी शत्रूला हा किल्ला सहजासहजी सर करता येत नव्हता. मात्र किल्ल्यातून परिसरातील दोन किलोमीटर अंतरावरील शत्रू सहज टिपता येत असे. याकरिता किल्ल्यात टेहळणी करण्यासाठी १५० फूट उंचीचे उपली बुरूज उभारले. ३६० अंशामध्ये शत्रूवर तोफांचा मारा करता येईल, अशी या बुरूजाची रचना आहे. किल्ल्याच्या तटभिंती दुहेरी अन् रूंद तसेच उंच आहेत. या तटभिंतीची एकंदरीत लांबी जवळपास ३ किलोमीटर असून त्यावर ११४ बुरुज आहेत. शिवाय पसरट व खोल असे जलयुक्त खंदक तयार केलेले आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिभव्य बुरूजयुक्त आहे. नऊपैकी परंडा बुरुज, संग्राम बुरुज हे प्रमुख बुरूज आहेत. किल्ल्यात हत्ती दरवाजा, हुलमुख दरवाजा, पाणी महल दरवाजा, सदर दरवाजा, काठी दरवाजा हे महत्त्वपूर्ण दरवाजे आहेत. अशा या किल्ल्याचे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देश व विदेशातील पर्यटक व इतिहासप्रेमी, अभ्यासकही भेट देतात. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणून रणमंडळ आणि पाणीमहलची ओळख. मीर इमादीन या वास्तुविशारदाने पाणीमहाल बांधला. यातून प्राचीन स्थापत्य कलेची अनुभूती येते. रणमंडळ व किल्ला यामध्ये असलेल्या खंदकाची खोली वाढवून त्यात बोरी नदीचा प्रवाह सोडून किल्ल्याची पाण्याची गरज भागविली आहे. खंदकात बारामाही पाणी साठून राहावे याकरिता रणमंडळ आणि किल्ल्याला जोडून एक बंधारा बांधलेला आहे. यालाच पाणीमहल बंधारा असेही म्हणतात. या बंधाऱ्याची उंची व रुंदी जवळपास २० मीटरहून जास्त आहे. या बंधाऱ्याच्या पोटात नैसर्गिकरित्या थंड हवेचे पाणीमहाल निर्माण केले आहेत. येथे येण्या-जाण्यासाठी पायऱ्यांच्या सहाय्याने मार्ग बनवलेला आहे. पाणीमहालात गणेश मूर्तीही आहे. तसेच नक्षीदार खिडक्या असून त्या महिरपीने सजवलेल्या आहेत. या बंधाऱ्यावर म्हणजे पर्यायाने पाणीमहालावर खंदकात साठलेले जास्तीचे पाणी बाहेर सोडण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या विसर्गालाच नर-मादी धबधबा असे संबोधले जाते. जेव्हा खंदकातील पाणी साठ्यात वाढ होते तेव्हा जास्तीचे पाणी प्रथम मादी धबधब्यातून बाहेर पडते. तसेच बोरी नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा नर-मादी धबधब्यातून जवळपास ८० फूट उंचीवरून पाणी खाली दरीत कोसळते. जेव्हा पाण्याचा विसर्ग सांडव्यातून होतो तेव्हा पाण्याला गती प्राप्त होईल अशी रचना केलेली असून या प्रवाहाचा वेग प्रतिसेकंद १० हजार लीटर इतका असतो. सांडव्यातून कोसळणारे पाणी फेसाळते व पांढरेशुभ्र असल्याने ते दृश्य विलोभनीय व नयनरम्य दिसते.
चाैकट...
‘युनिटी’कडे संवर्धनाचा ठेका...
किल्ल्याच्या संगोपनाचा व संवर्धनाचा ठेका सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉनला देण्यात आला आहे. युनिटी मल्टीकॉनने किल्ल्याच्या मूळ रचनेत किंवा बांधकामात कसलाही हस्तक्षेप न करता केवळ तटभिंतीची डागडुजी, ढासळलेल्या भिंतींची पुनर्बाधणी, भिंतीवरील झाडे-झुडपे तोडून, रंगरंगोटी केली. ‘युनिटी’चे संचालक कफिल मौलवी, वैशाली जैन, जयधवल करकमकर यांनी किल्ल्याला पंचतारांकित लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना पर्यटकांतून चांगली दाद मिळत आहे.