सावधान, व्हायरल फिव्हर, डेंग्यूसदृश रुग्ण वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:37+5:302021-09-17T04:39:37+5:30
उस्मानाबाद : मागील काही दिवस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. त्यामुळे रिकामे डबके, नाल्यामध्ये पाणी साचून राहिले आहे. परिणामी, डासोत्पत्ती ...

सावधान, व्हायरल फिव्हर, डेंग्यूसदृश रुग्ण वाढले !
उस्मानाबाद : मागील काही दिवस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. त्यामुळे रिकामे डबके, नाल्यामध्ये पाणी साचून राहिले आहे. परिणामी, डासोत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश व डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत, तर बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हरचे रुग्णही आढळून येत आहेत. जिल्हा रुग्णालयात ओपीडी दुप्पट वाढली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, दुसरीकडे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती व्हायरल सर्दीच्या कचाट्यात सापडला आहे, तर पावसामुळे नाले, पाण्याच्या डबक्यात पाणी साचले आहे. त्यामुळे डासोत्पत्ती वाढली आहे. त्यातून डेंग्यूसारखे आजारही बळावत आहेत. परिणामी, जिल्हा रुग्णालयातील ओपीडी दुपटीने वाढली आहे. आजार अंगावर न काढता त्वरित रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्याच्या मागे वेदना होणे, सांधे दुखी होणे, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, उच्च ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, भूक हरवणे.
चिकुनगुनिया लक्षणे
ताप, तीव्र सांधे दुखी, मळमळ होणे, पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी, थकवा येणे,
कावीळची लक्षणे
तीव्र पोटदुखी, अति थकवा येणे, उलट्या आणि मळमळ होणे, खाज येणे, झोप कमी होणे, मानसिक त्रास वाढणे, त्वचा व डोळे पिवळे होणे, मूत्राचा रंग पिवळा होणे,
रोज किमान ५० रुग्ण
जिल्हा रुग्णालयात ओपीडी दुपटीने वाढली आहे. सर्दी, खोकला, व्हायरल फिव्हरचे दररोज जवळपास ५० रुग्ण ओपीडीला येत आहेत. त्याचबरोबर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चिकुनगुनिया, कावीळचे रुग्णही उपचारास येत होते.
लहान मुलांचे प्रमाण जास्त
बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले आहेत. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. जिल्हा रुग्णालयातील बाल रुग्ण कक्षात बालके उपचारास दाखल होत आहेत. तसेच शहरातील खासगी दवाखान्यातही बालकांची गर्दी दिसून येत आहे.
कोट...
आजार अंगावर काढू नका
जिल्हा रुग्णालयातील ओपीडी पूर्वी ३०० ते ४०० च्या जवळपास होती. सध्या दररोज ७०० ओपीडी होत आहे. ताप, सर्दी, खोकला, डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण जास्त आहेत. लक्षणे आढळून आल्यानंतर आजार अंगावर न काढता त्वरित उपचार घ्यावेत.
डॉ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
जिल्हा रुग्णालयाची ओपीडी ७०० च्या जवळपास आहे, तर आयपीडी सुमारे २०० इतकी राहत आहे. सध्या डेंग्यूचे ३ रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूसदृश आजार व व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.