खबरदार ! नवरात्रीत दारु विकाल तर; गुन्हे शाखेकडून अवैध विक्रेत्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 15:03 IST2021-10-07T14:59:15+5:302021-10-07T15:03:41+5:30
Navratri : नवरात्रीच्या काळात तुळजापूरला भाविकांचा मोठा ओघ असतो. अनेकजण विविध रस्त्यांनी पायी चालत येत असतात. अशावेळी काही अपप्रवृत्ती अवैधरित्या देशी-विदेशी दारुची विक्री जोमाने करतात.

खबरदार ! नवरात्रीत दारु विकाल तर; गुन्हे शाखेकडून अवैध विक्रेत्यांवर धाडी
उस्मानाबाद : सध्या सुरु असलेल्या नवरात्र ( Navratri ) महोत्सवाच्या काळात अवैध दारु विक्री करुन शांततेला बाधा पोहोचविणाऱ्यांवर पोलीस दलाने कारवाया सुरु केल्या आहेत. याअंतर्गतच बुधवारी सायंकाळी येडशी येथे गुन्हे शाखेने ( Crime Branch raid ) एकावर कारवाई करीत देशी-विदेशी दारु जप्त केली.
नवरात्रीच्या काळात तुळजापूरला भाविकांचा मोठा ओघ असतो. अनेकजण विविध रस्त्यांनी पायी चालत येत असतात. अशावेळी काही अपप्रवृत्ती अवैधरित्या देशी-विदेशी दारुची विक्री जोमाने करतात. ही बाब लक्षात घेता अशा अपप्रवृत्तींना वेसण घालण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना व पोलीस अधीक्षक नीवा जैन, अपर अधीक्षक नवनीत कावत यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शैलेश पवार व त्यांच्या पथकाने येडशी येथील विक्रेत्याची माहिती काढून सायंकाळी अचानक धाड टाकली. यावेळी सूरज गणपत पवार हा अवैधरित्या दारु विक्री करण्यासाठी साठा बाळगून असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून साडेअकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापुरात वैध विक्रीही बंद...
नवरात्र काळात तुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने तीन दिवस दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. ७, १५ व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी १९ ऑक्टोबरला सर्व प्रकारची दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.