तुळजापुरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; पोलिसांचा छाप, एकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 23:19 IST2025-04-01T23:18:51+5:302025-04-01T23:19:26+5:30
सामन्यात होणारा अंदाजित स्कोअर, हार-जीत यावर कमी पैशात जास्त पैशांचे आमिष दाखवून मोबाईलच्या माध्यमातून सट्टा सुरू होता.

तुळजापुरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; पोलिसांचा छाप, एकाविरुद्ध गुन्हा
धाराशिव : चेन्नईविरुद्ध राजस्थान या संघाच्या आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी सोमवारी उशिरा तुळजापूर पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
आयपीएल सामन्यावर तुळजापुरात सट्टा लावण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ भागात भोसले गल्लीतील प्रमोद रमेश कदम याचे राहत्या घरासमोर छाप टाकला. यावेळी घरासमोरील कट्ट्यावर बसून आयपीएल-२०२५ या क्रिकेट लीगमधील चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील मॅचवर सट्टा लावण्यात येत असल्याचे समोर आले. सामन्यात होणारा अंदाजित स्कोअर, हार-जीत यावर कमी पैशात जास्त पैशांचे आमिष दाखवून मोबाईलच्या माध्यमातून सट्टा सुरू होता. यावेळी पथकाने मोबाईल, सट्टयात पैसे लावलेले रजिस्टर व इतर साहित्य जप्त केले.
याप्रकरणी अमोल रमेश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून सोमवारी उशिरा तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने तर सपोनि खटके यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.