जीवावर उदार होऊन ते पार पाडत आहेत अंत्यसंस्काराची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:08+5:302021-04-21T04:32:08+5:30
: कोरोना संसर्गाचा घाला अनेक निष्पाप लोकांवर बसत आहे. एप्रिल महिन्यात गेल्या एकोणीस दिवसात रुग्णसंख्या सहाशेपार झाली असून, ११ ...

जीवावर उदार होऊन ते पार पाडत आहेत अंत्यसंस्काराची जबाबदारी
: कोरोना संसर्गाचा घाला अनेक निष्पाप लोकांवर बसत आहे. एप्रिल महिन्यात गेल्या एकोणीस दिवसात रुग्णसंख्या सहाशेपार झाली असून, ११ मार्चपासून आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांवर असून, जीवाचा धोका पत्करत हे पाच जण रात्रंदिवस हे काम करीत आहेत.
सध्या कोरोना संसर्गाचा वेग चांगलाच वाढला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ त्यांचे नातेवाईकही जायला धजावत नाहीत. अशा परिस्थितीत स्वत:च्या जीवाचा विचार न करता धोका पत्करत पालिकेचे कर्मचारी मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. मृत व्यक्तिचा अहवाल पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर मुकादम परमेश्वर सौंदरगे, कर्मचारी संतोष कांबळे, शाहुराज कांबळे, सदाशिव जाधव, राजू देडे, शववाहिका चालक निखिल मोरे हे लगेचच अंत्यसंस्काराची तयारी करतात. रुग्णालयातून प्रेत उचलण्यापासून ते वाहनातून स्मशानभूमीत नेवून तेथे सरण रचणे आणि प्रेतावर अंत्यसंस्काराचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागते. अनेक मयतांच्या नातेवाईकांची इच्छा विधिवत अंत्यसंस्कार करण्याची असते. तेव्हा या कर्मचाऱ्यांवर ताण येतो; तरीही नातेवाईकांचा आग्रह पूर्ण करण्याचा प्रयत्न हे कर्मचारी करतात.
या पथकात राजू देडे, चालक निखिल मोरे हे कंत्राटी कामगार असून, ते तूटपुंज्या पगारीवर पालिकेत काम करतात. सर्वात जोखमीचे अंत्यसंस्काराचे काम तेच पार पाडतात. पालिकेकडून कायम कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी व इतर सुविधा मिळत असल्या तरी कंत्राटी कामगार या आर्थिक आधारपासून वंचित आहेत. त्यामुळे उद्या काही बरे वाईट झाल्यास यांच्या पाठीमागे यांच्या कुटुंबियांना कोणताही आर्थिक आधार नसल्याने या बाबीचा विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाते दुरावले ; ऑनलाईन अंत्यदर्शन
कोरोनामुळे नाती तर दुरावलीच, पण अंत्यदर्शनही घेता येत नाही. स्मशानभूमीत मोजकेच नातेवाईक लांबूनच अंत्यदर्शन घेतात. नातेवाईकांच्या हृदयाला पाझर फुटतो. पण, ऐनवेळी मन कठोर करावे लागत आहे. जवळच्या नातेवाईकांना अंत्यदर्शन शक्य होत नसल्याने इतर नातेवाईक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अंत्यदर्शन घडवून आणत आहेत. दरम्यान, सोमवारी येणेगूर, एकुरगावाडी व बोरी येथील तिघे कोरोनामुळे मयत झाले. या सर्वांवर उमरगा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशेष आर्थिक मोबदल्याची गरज
कोरोनाच्या कठीण काळात धोका पत्करत बाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कारांचे सोपस्कार करण्याचे काम करणाऱ्या पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचारी कायम पगारी, तर दोघे रोजंदारीवर आहेत. या पाच कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत गेल्या मार्च महिन्यापासून ४८ जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांना मिळणारा मोबादला तूटपुंजा आहे. यामुळे शासन, प्रशासनाने त्यांच्यासाठी विशेष आर्थिक मोबदला दिला तर कुटुंबाला मदत होऊ शकते.
मागील वर्षभरापासून कर्तव्य म्हणून बाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे काम आम्ही पाच कर्मचारी करत आहोत. हे सर्व करत असताना आम्हाला परिवाराची चिंता असते. घरी गेल्यावर दोन वेळा आंघोळ करावी लागते. जेवणसुद्धा बाहेर बसून करावे लावते. जीवावर उदार होऊन कर्तव्य म्हणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत आहोत.
- राजू देडे, कंत्राटी कर्मचारी