जुन्या भांडणातून लोखंडी गजाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:20 AM2021-02-22T04:20:50+5:302021-02-22T04:20:50+5:30

पिता-पुत्रांनी केली एकास जबर मारहाण लोहारा : पिता-पुत्रांनी मिळून एकास जबर मारहाण केल्याची घटना सास्तूर येथे घडली. सास्तूर येथील ...

Beaten with an iron bar from an old quarrel | जुन्या भांडणातून लोखंडी गजाने मारहाण

जुन्या भांडणातून लोखंडी गजाने मारहाण

googlenewsNext

पिता-पुत्रांनी केली एकास जबर मारहाण

लोहारा : पिता-पुत्रांनी मिळून एकास जबर मारहाण केल्याची घटना सास्तूर येथे घडली. सास्तूर येथील भरत, आनंद व देवचंद आदाप्पा जैन या तिघा पित्रा-पुत्रांनी संगनमताने १६ फेब्रुवारी रोजी महालिंग बसवंत माळी यांच्या शेतीतील हरभरा पिकाचे नुकसान केले. याचा जाब महालिंग माळी यांनी विचारला असता, या तिघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी माळी यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

(सिंगल फोटो : पांडुरंग पोळे)

नळदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागच्या जिल्हाध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील ॲड.अमोल राजकुमार पाटील यांची नियुक्ती झाली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मतीन जहिरोद्दीन इनामदार यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

विक्रम चव्हाण यांचे व्याख्यान

माडज : येथील ग्रामीण प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विक्रम चव्हाण यांचे ऑनलाइन व्याख्यान पार पडले. उपक्रमशील शिक्षक डॉ.बालाजी मदन इंगळे यांनी याचे नियोजन केले. यावेळी दिगंबर फुकटे, व्यंकटेश चव्हाण, बाळासाहेब पेठसांगवीकर, पांडुरंग मुंडकर आदी शिक्षकांसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संचालन बालाजी इंगळे यांनी केले, तर आभार बाळासाहेब पेठसांगवीकर यांनी मानले.

पाण्याच्या टाकीचे गुंजोटीत लोकार्पण

उमरगा : गुंजोटी येथे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त बेंच व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच ग्रा.पं.च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामराव चव्हाण होते. यावेळी पोनि. मुकुंद आघाव, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सरपंच सरस्वती कारे, उपसरपंच आयुब मुजावर, सदस्य सुरेश सूर्यवंशी, शेषराव खंडागळे, रवी देशमुख, योगेश शिंदे श्रीनिवास हिरवे, इंद्रजीत म्हत्रे, राहुल माने, विजया चव्हाण, स्नेहा पाटील, रिहाना बेगम कुरेशी, सुनीता बेळंमकर अंजुमबी औटी, जयश्री कलशेट्टी, शीतल हाके, सुनीता जयतेथोर यांचा सत्कार करण्यात आला व सर्व पदधिकारी, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.

महाविद्यालयात शिवजयंती साजरी

उमरगा : येथील आदर्श महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा.डॉ.उमेश केसरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्च डॉ.दिलीप गरूड होते. यावेळी उपप्राचार्य बाबा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.डॉ.बालाजी मोरे यांनी केले. आभार प्रा.डॉ.उदय दिंडोरे यांनी मानले. कोरोना संसर्गाच्या नियमांची काटेकोरपणे अंबलबजावणी करून हा उत्सव पार पडला.

जनता विद्यालयात मस्के यांचे व्याख्यान

येडशी : येथील जनता विद्यालयात शिवजयंतीनिमित्त प्रा.डी.डी. मस्के यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य जे.के. बेदरे होते. प्रास्ताविक प्रा.आर.यू. रणदिवे यांनी केले. सकिना तांबोळी, निकिता ईटकर, कल्याणी नखाते यांनीही शिवाजी महाराजांवर आपले विचार मांडले. कल्याणी नखाते व अश्विनी जाधव यांनी शिवाजी महाराजांवरील गीत गायले. गायत्री नवले व प्रतीक्षा दिवाणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा.एस.एम. वाघमारे, प्रा.ए.एस. लांडगे, प्रा.बी.डी.अवधूत आदी यावेळी हजर होते.

शिवजयंतीनिमित्त मूर्तीस दुग्धाभिषेक

तुळजापूर : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी गणेश अंबुलगे, शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंके, साक्षी साळुंके, सुजीत साठे, नितीन जट्टे, विकास वाघमारे, ओम वाघमारे, ओंकार पवार, रोहन गडकर, अलोक शिंदे, जोतिबा मुसळे, सत्यजीत चौगुले, विजय भोसले, ओंकार काशेगावकर, राम कांबळे, अभिषेक भांजी, वैभव भगरे, विशाल मगर, शिवप्रेमी उपस्थित होते.

कोरेगाव शाळेत शिवप्रतिमा पूजन

उमरगा : तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिकाताई वाघमोडे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक स्वामी प्रवीण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी सहशिक्षक उमाचंद्र सूर्यवंशी, अशोक बिराजदार, लक्ष्मी वाघमारे, अंबाजी सूर्यवंशी व विद्यार्थी उपस्थित होते.

------------

चव्हाण यांचा सत्कार

(फोटो : बालाजी बिराजदार २१)

लोहारा : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आ.सतीश चव्हाण हे नुकतेच लोहाऱ्यात आले होते. यावेळी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शिवसेना व युवासेनेच्या वतीने नगरसेवक अभिमान खराडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी त्यांचा सत्कार केला.

पोलिसांचे आवाहन

(फोटो : दत्ता पवार २१)

येडशी : उस्मानाबाद ग्रामीण पोलीस आवारात अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीमध्ये ५५ दुचाकी गाड्या बेवारस स्थितीमध्ये पडून आहेत. संबंधित मालकांनी या दुचाकी घेऊन जाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देशी दारू जप्त

कळंब : येथील पोलिसांनी मोहा येथे छापा टाकून बापू मख्खल काळे याच्याकडून देशी व गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनाळ्यात कारवाई

परंडा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी अनाळा येथे छापा टाकला. यावेळी कालिदास पवार हे त्यांच्या राहत्या घरासमोर देशी दारूच्या बाटल्यांसह मिळून आले. हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अंधाराचे साम्राज्य

परंडा : शहरातील अंतर्गत भागातील काही पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची विशेषत: महिला व वृद्धांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व दिवे सुरू करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Beaten with an iron bar from an old quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.