शेतरस्त्यासाठी कुटुंबीयांसह धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST2021-01-24T04:15:39+5:302021-01-24T04:15:39+5:30
उमरगा : तालुक्यातील बेटजवळगा येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आपल्या कुटुंबीयासह शनिवारपासून बेमुदत ...

शेतरस्त्यासाठी कुटुंबीयांसह धरणे आंदोलन
उमरगा : तालुक्यातील बेटजवळगा येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आपल्या कुटुंबीयासह शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात ७ डिसेंबर, २०२० रोजी बेट जवळगा येथील राजेंद्र पांडुरंग शिंदे व इतर शेतकऱ्यांना तहसीलदारांना निवेदन दिले होते. यात म्हटले आहे, आम्हाला शेताकडे जाण्यासाठी मागील साठ ते सत्तर वर्षांपासून शेतरस्ता उपलब्ध होता, परंतु आता काही लोकांनी हा रस्ता बंद केला आहे. या संदर्भात तहसीलदारांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी मागणी रास्त असल्याचे सांगत, संबंधितांना रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. यानुसार, पोलीस अधीक्षकांनाही रस्ता खुला करताना पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी अर्ज दिला. महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर महसूल अधिकारी हे सदरील रस्ता खुला करून देण्यासासाठी १९ जानेवारी रोजी येथे आले होते, परंतु त्यावेळी सदर रस्त्याच्या लगत असलेल्या गैरअर्जदार शेतकऱ्यांनी हा रस्ता खुला करून देत असताना प्रशासकीय लोकांना विरोध केला.
दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनीही रस्ता खुला करून देण्याबाबत आदेश दिले असून, याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देऊनही प्रशासनाकडून आजवर कुठलीच कार्यवाही झाली नसल्यामुळे राजेंद्र शिंदे, व्यंकट शिंदे, तानाजी शिंदे, कमलाकर शिंदे, बाबू शिंदे या शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.