सावधान..! लक्ष विचलित झाल्यास लूटमार अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:10+5:302021-09-21T04:36:10+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यातील सोलापूर-धुळे महामार्ग प्रवासासाठी अतिशय आरामदायी ठरत असला तरी याच महामार्गावर ...

सावधान..! लक्ष विचलित झाल्यास लूटमार अटळ
उस्मानाबाद : जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यातील सोलापूर-धुळे महामार्ग प्रवासासाठी अतिशय आरामदायी ठरत असला तरी याच महामार्गावर काही ठिकाणी चालकांचे लक्ष विचलित करून त्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या असल्या तरी काही ठराविक अंतरात चालकांनी सतर्क राहणेच आवश्यक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून सोलापूर-हैदराबाद, रत्नागिरी-नागपूर, सोलापूर धुळे व खामगाव-पंढरपूर असे चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यातील सोलापूर-धुळे महामार्गावरील तेरखेडा ते सरमकुंडी फाटा यादरम्यानच्या अंतरात लुटारूंची टोळी सक्रिय आहे. नेमके याच भागात वेगवेगळी शक्कल लढवून हे लुटारू वाहनचालकांचे लक्ष विचलित करतात. किंबहुना, वाहनास इजा पोहोचवून ते थांबविण्यास भाग पाडतात अन् मग पुढचा कार्यभाग उरकतात. याबाबतीत पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या आहेत. गस्तही वाढविली आहे. मात्र, गस्त पथकावरच लक्ष ठेवून ते पुढे जाताच लुटारू ॲक्टिव्ह मोडमध्ये येतात. गेल्या वर्षभरात अशा घटना उपरोल्लेखित अंतरातच झाल्या आहेत. त्यामुळे चालकांनी या भागात सतर्कतेने वावरणे आवश्यक आहे. किंबहुना शंकास्पद घडामोडी लक्षात आल्यास त्या तातडीने पोलिसांना कळविणे गरजेचे आहे.
नकली गतिरोधक केले तयार...
काही दिवसांपूर्वीच महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना एक नकली गतिरोधक आढळून आले होते. लुटारूंनी एका कापडावर पांढऱ्या चकाकणाऱ्या पट्ट्या ओढून ते रस्त्यावर अंथरले होते. जेणेकरून येथे चालक वाहनाची गती कमी करतील व लुटारूंचे काम सोपे होईल. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
असे तुमच्या बाबतीतही घडू शकते...
१. काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या एका व्यापाऱ्याच्या कारसमोर मध्यरात्री अचानक एक लोखंडी साहित्य टाकण्यात आले. त्यामुळे लक्ष विचलित झालेल्या चालकाने कार थांबविली. ती थांबताच लुटारूंनी वाहनास गराडा घालून धमकावत सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. यथावकाश ही टोळी सापडली. मात्र, तोवर मनस्ताप झालाच.
२. काही दिवसांपूर्वीच एका ट्रकसमोर टोकदार साहित्य टाकून लुटारूंनी वाहन पंक्चर करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ट्रकचे चार टायर फुटून नुकसानग्रस्त झाले. यामुळे वाहन थांबवताच लुटारूंनी चालक व क्लीनरला धमकावून त्यांच्याकडील रोकड व मोबाइल पळवून नेले. शिवाय, हजारो रुपये किमतीचे टायरही कामातून गेलेच.
काय काळजी घ्याल...
महामार्गावरून प्रवास करीत असताना आपल्या वाहनाचे दरवाजे लॉक असतील याची काळजी घ्यावी. निर्जन ठिकाणी कोणत्याही कारणास्तव वाहन थांबवू नये. घालून दिलेल्या मर्यादेतच वेग असावा. घातपाताचा संशय येताच तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.