रस्त्यावर वाढदिवस साजरा कराल तर खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:52+5:302021-09-19T04:33:52+5:30
उमरगा : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्यांविरुद्ध किंवा रस्त्यावर लोकांना एकत्र जमवून वाढदिवस साजरा केल्यास आता महाग पडू ...

रस्त्यावर वाढदिवस साजरा कराल तर खबरदार
उमरगा : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्यांविरुद्ध किंवा रस्त्यावर लोकांना एकत्र जमवून वाढदिवस साजरा केल्यास आता महाग पडू शकते. थेट पोलिसांकडून आपल्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
अलीकडे अनेकजण स्टंटबाजी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावरच आपला व राजकीय पदाधिकारी यांचा वाढदिवस थाटामाटाने साजरा करण्याचे फॅड वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा वाढदिवस असाच रात्रीच्या सुमारास भर रस्त्यावर साजरा केल्याने गर्दी जमली होती. याची खबर पोलिसांना लागताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्वांनाच समज दिली व गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. परंतु, एका राजकीय पुढाऱ्याने मध्यस्थी करीत तरुणांना माफी मागायला लावली होती. त्यामुळे गुन्हा दाखल न करता समज देऊन सोडण्यात आले. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तर गुन्हा दाखल
सध्या सण, उत्सव असल्याने रस्त्यावर अडथळा निर्माण करून कार्यक्रमाचे आयोजन केल्यास थेट गुन्हा दाखल होऊ शकतो.
सार्वजनिक रस्त्यावर लोकांना एकत्र आणून केक कापणे, तलवारीने केक कापणे, डीजे लावणे, रस्त्यावर मध्यरात्री मोठ्या आवाजाचे ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
शिवाय, रस्त्यावर मंडप टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यासदेखील नागरिकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा
काही दिवसांपूर्वी शहरात एका तरुणाचा वाढदिवस त्याच्या मित्रांनी भररस्त्यात दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून साजरा केला होता. तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणाची दखल उमरगा शहर पोलिसांनी घेत त्या तरुणांना घटनास्थळी जाऊन चांगलीच समज दिली होती.
वाढदिवस साजरा करताना असे प्रकार केल्यास किंवा रस्त्यावर नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केल्यास, रहदारीस अडथळा केल्यास तो गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे रस्त्यावर तलवारीने केक कापणे, विनापरवाना डीजे लावून रस्त्यावर गोंधळ घालणे, रस्त्यावर वाहने उभी केल्यास गुन्हा नोंद होणार असून, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
- महेश क्षीरसागर, सपोनि, उमरगा