कळंबच्या मांजरातीरी साकारणार बांबूचे बन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST2021-08-29T04:31:21+5:302021-08-29T04:31:21+5:30
कळंब : मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या कळंब शहरालगतच्या नदी काठावर ‘बांबूचे बन’ साकारण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून, शनिवारी पहिल्या ...

कळंबच्या मांजरातीरी साकारणार बांबूचे बन
कळंब : मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या कळंब शहरालगतच्या नदी काठावर ‘बांबूचे बन’ साकारण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून, शनिवारी पहिल्या टप्प्यात मांजरा नदी पुलालगतच्या भागात अडीचशे बांबू रोपांची लागवड करण्यात आली आहे.
गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेली मांजरा नदी कळंब शहराला स्पर्शून प्रवाही होते, याशिवाय पुढे तालुक्यातील दाभा भागात याच नदीवर मांजरा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्यास बॅकवॉटरचे पाणी, पण कळंब शहरालगतच्या पात्रात महिनोंमहिने स्थिरावत असते. याच ठिकाणी मध्यंतरी कळंबकरांनी एकत्र येत, मांजरा नदीचे खोलीकरण केले असल्याने पाण्याने भरलेल्या या मांजरामायचे निसर्गसौंदर्य मावळतीच्या वेळेस तर अधिकच खुललेले असते. यात आता रोटरीच्या प्रयत्नांतून अधिकच भर पडणार आहे.
खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरा नदी पुलापासून उलट दिशेने बांबूची लागवड करण्याचा संकल्प कळंब शहर रोटरी क्लबने केला आहे. यानुसार, शनिवारी मांजरा पुलालगतच्या बुडीत, पडीक क्षेत्रात अडीचशे बांबू रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र शाह, सचिव अरविंद शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन करसन पटेल, पंडित दशरथ, करसन पटेल, डॉ.अभिजीत जाधवर, डॉ.सचिन पवार, डॉ.सुयोग काकांनी, ॲड.दत्ता पवार, रवि नारकर, गणेश डोंगरे आदी उपस्थित होते.
चौकट...
पर्यावरणाचे संवर्धनही अन्...
मांजरा नदीला मोठा पूर आल्यानंतर नदीकाठावर मोठे नुकसान, मातीची धूप होते. याचा विचार करत पर्यावरण संतुलन, जलसंधारण, उत्पन्नातून जीवनमान उंचावणे, याचबरोबर या भागाचे निसर्ग सौंदर्य खुलावे, या उद्देशाने मांजरा नदीच्या तीरावर बांबू लागवड हाती घेतली आहे, असे रोटरीचे अध्यक्ष धर्मेंद्र शहा, सचिव अरविंद शिंदे यांनी सांगितले.
तालुकाभरात अभियान
बांबूला झाड नव्हे, तर गवतवर्गीय वनस्पतीचा दर्जा मिळाला आहे. एका रोपट्यापासून शंभर रोपट्यांत वृद्धिंगत होणारा बांबू कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा, कोरडवाहू भागात जीवनमान उंचावणारा ठरणार आहे. मांजरा नदीप्रमाणेच बांबू लागवड अभियान स्वरूपात तालुकाभरात राबविणार असल्याचे रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन करसन पटेल यांनी सांगितले.