छोट्या व्यापाऱ्यांवर बडगा, ई-कॉमर्सला रेड कार्पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:44+5:302021-09-24T04:38:44+5:30

उस्मानाबाद : देशात विदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू केला आहे. त्याविरुद्ध ...

Badga on small traders, red carpet on e-commerce | छोट्या व्यापाऱ्यांवर बडगा, ई-कॉमर्सला रेड कार्पेट

छोट्या व्यापाऱ्यांवर बडगा, ई-कॉमर्सला रेड कार्पेट

उस्मानाबाद : देशात विदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू केला आहे. त्याविरुद्ध देशभरातील व्यापारी आक्रमक बनले असून, गुरुवारी उस्मानाबादेतील व्यापारी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

देशभरातील व्यापाऱ्यांनी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया व महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर चालणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या व ई-कॉमर्स व्यापाराविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. त्यास पाठिंबा दर्शवीत उस्मानाबाद येथील व्यापारी महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विदेशी ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. उच्च न्यायालय व अन्य न्यायालयांनीही तीव्र टिपण्या नोंदविलेल्या आहेत. तरीही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. एखाद्या सर्वसामान्य व्यापाऱ्याने छोटीशी चूक केली, तर प्रशासनाकडून कायद्याचा बडगा उगारला जातो. परंतु, ई-कॉमर्स कंपन्या ज्या धर्तीवर काम करत आहेत, त्यात छोटे व्यापारी भरडले जात आहेत. देशातील व्यापार देशातच राहिला पाहिजे, त्याचा लाभ देशातील उपभोक्ते, व्यापारी, उद्योजक यांना झाला पाहिजे, कोणतीही विदेशी ईस्ट इंडिया कंपनी पुन्हा देशात उभी राहू नये व व्यापार हातात घेऊ नये, याबाबतीत केंद्र सरकारने कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे महासंघाने आपल्या निवेदनातून म्हटले आहे.

निवेदन देताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर, सदस्य विशाल थोरात, नितीन फंड व व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Badga on small traders, red carpet on e-commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.