भाविकांनो लक्ष द्या! श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शनवेळ पुन्हा पहाटे ४ वाजेपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:44 IST2025-07-14T11:40:58+5:302025-07-14T11:44:55+5:30
गर्दी कमी झाल्याने मंदिर संस्थानने घेतला निर्णय

भाविकांनो लक्ष द्या! श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शनवेळ पुन्हा पहाटे ४ वाजेपासून
तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिरातील भाविकांची गर्दी आता कमी झाली आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याची वेळही पूर्वीप्रमाणेच पहाटे चार वाजताची करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, अभिषेक घाटच्या वेळेत मात्र कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचेही संस्थानने स्पष्ट केले आहे.
गर्दीचा हंगाम पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुजाऱ्यांच्या मागणीनुसार तुळजाभवानी मंदिर उघडण्याच्या वेळात बदल केला होता. यानुसार मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा तसेच सुट्टीच्या दिवशी भाविकांची गर्दी जास्त राहत असल्यामुळे या दिवशी मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १२ जुलैपर्यंत करण्यात आली. परंतु, त्यानंतर मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या संपल्या, शिवाय लग्नसराईदेखील संपल्यामुळे भाविकांची गर्दी रोडावली आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याची वेळ पूर्वीप्रमाणे पहाटे चार वाजता करण्यात आली आहे.
पहाटे सहा वाजता अभिषेक घाट
चार वाजता मंदिर उघडल्यानंतर चरणतीर्थ होऊन देवी भाविकांच्या दर्शनासाठी सुरुवात होणार आहे. यानंतर पहाटे सहा वाजता अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ होईल. यात कोणताही बदल केला गेला नाही. या बदलाची महंत, पुजारी, देवी भाविक व सेवेकरी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.