प्रयत्नांती परमेश्वर... मेडिकल कॉलेज मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST2021-01-14T04:27:38+5:302021-01-14T04:27:38+5:30
उस्मानाबाद : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अखेर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाचा ...

प्रयत्नांती परमेश्वर... मेडिकल कॉलेज मंजूर
उस्मानाबाद : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अखेर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाचा प्रस्ताव आता केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी जाणार असल्याने उस्मानाबादकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच हे महाविद्यालय सुरू करण्याविषयी पाठपुरावा करण्यात येत होता. जिल्हा रुग्णालयासाठी नव्याने उभारण्यात आलेली सुमारे ९ कोटींची इमारत बांधून तयार झाली आहे. कोरोनाच्या काळात तिचा वापरही सुरू करण्यात आला आहे. याचठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यास पुरेशी जागाही उपलब्ध आहे. शिवाय, पशुसंवर्धन विभागाची जमीन महाविद्यालयासाठी देण्यात येत आहे. दरम्यान, मागील सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात आ. सुजितसिंह ठाकूर यांनी हा विषय उचलून धरल्यानंतर तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. यानंतर तज्ज्ञ समितीने जागेची व सुविधांची पाहणी करून सकारात्मक अहवाल दिला होता. मात्र, त्यानंतरच्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये हा विषय पुन्हा प्रलंबित राहिला. नवे सरकार आल्यानंतरही महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने खा. ओम राजेनिंबाळकर, आ. राणाजगजीतसिंह पाटील, आ. कैलास पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता. दरम्यान, बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढची वाट सोपी
राज्याने मंजूर केलेला हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे जाईल. केंद्र सरकारच्या धाेरणानुसार नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असणाऱ्या जिल्ह्यांना वैद्यकीय महाविद्यालय देण्यास प्राधान्य आहे. त्यामुळे पुढची वाट सुकर होऊन पुढच्याच शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
कोट...
उस्मानाबादकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी महाविकास आघाडीच्या सरकारने प्रत्यक्षात उतरविली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबादच्या महाविद्यालयासाठी पुढाकार घेऊन बैठका घेतल्या होत्या. त्यांनी यात विशेष लक्ष घातल्याने प्रश्न मार्गी लागला. आता पुढची प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन उस्मानाबादकरांची आरोग्यसेवा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील.
-कैलास पाटील, आमदार
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या उस्मानाबादेतील वैद्यकीय महाविद्यालयास अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर उशिरा का होईना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याबद्दल मनापासून आभार. आता तातडीने हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवावा, तसेच एम्ससारख्या अद्ययावत व आधुनिक उपचार पद्धतीने युक्त संस्थेसाठी आग्रह धरण्यात यावा.
-राणाजगजीतसिंह पाटील, आमदार