शेंगा भरतेवेळी ओढ दिली अन् काढणीवेळी गाठले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:48+5:302021-09-06T04:36:48+5:30
मानकेश्वर मंडळात सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर उडदाची तर ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. ...

शेंगा भरतेवेळी ओढ दिली अन् काढणीवेळी गाठले...
मानकेश्वर मंडळात सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर उडदाची तर ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. ही दोन्ही पिके कमी कालावधीची आहेत. एन फुले व शेंगा लागण्याच्या वेळीच वरुणराजाने दडी मारली. जवळपास २१ ते २५ दिवसांचा खंड पडल्याने फुले गळरून पडली. त्यामुळे ५० टक्के शेंगा कमी लागल्या. साेबतच पाण्याअभावी लागलेल्या शेंगाही भरल्या नाहीत. हे पीक सध्या काढणीला आले आहे. काही शेतकऱ्यांनी उडीद, मूग गाठून शेतात ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांची काढणी सुरू आहे. असे असतानाच शनिवारी रात्री माणकेश्वर मंडळात जाेदार पाऊस झाला. ११६ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. त्यामुळे काढणीला आलेला आणि काढणी झालेला उडीद, मूग पाण्याखाली गेले. उडीद, मूग पावसात भिजल्याने त्याचा रंग बदलणार आहे. बुरशीही लागू शकते. तातडीने मळणी न केल्यास माेडही फुटू शकतात. त्यामुळे यंदा ही दाेनही पिके शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचीच ठरणार आहेत.
चाैकट...
उडीद काढणीस आला आहे. परंतु, मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस हाेत असल्याने उडीद, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच माणकेश्वर मंडळात शेताला चांगले शेतरस्ते नसल्याने मळणी यंत्र शेतापर्यंत नेता येत नाही. यामुळेही नुकसान हाेत आहे.
-प्रशांत दोपारे, शेतकरी, माणकेश्वर.
बाजारात सध्या प्रतिदिन दहा हजार कट्टे उडदाची आवक होत आहे. पावसामुळे भिजलेला व ओला उडीद येऊ लागल्याने त्याला दरही कमी मिळत आहे. गुरुवारी ६ हजार ते ६ हजार ९०० हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. मागील दहा दिवसात जवळपास सातशे ते एक हजार रुपयांनी दर कमी झाले आहेत. असे असले तरी चांगल्या मालाला चांगला दर मिळत आहे.
-सुरेश अंधारे, आडत दुकानदार