काटी मंडळाअंतर्गत द्राक्षांचे दीडशे एकरने क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:27+5:302021-03-06T04:30:27+5:30
काटी मंडळात बहुतांश क्षेत्र खडकाळ आहे. हे क्षेत्र ओलिताखाली यावे, यासाठी माेठ्या प्रमाणात साठवण तलावांचे जाळे निर्माण करण्यात आले ...

काटी मंडळाअंतर्गत द्राक्षांचे दीडशे एकरने क्षेत्र वाढले
काटी मंडळात बहुतांश क्षेत्र खडकाळ आहे. हे क्षेत्र ओलिताखाली यावे, यासाठी माेठ्या प्रमाणात साठवण तलावांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. परिणामी या भागातील शेतकरी ऊस शेतीकडे वळले हाेते. परंतु, खर्चाच्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी ऊस शेतीला फाटा देत द्राक्ष लागवड केली. यातून चांगले उत्पन्न मिळाल्याने वर्षागणिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येत भर पडू लागली आहे. मागील वर्षापर्यंत मंडळातील सर्व गावांत मिळून २ हजार ५०० एकरावर द्राक्ष हाेते. यंदा यात आणखी दीडशे एकराची भर पडली आहे. बहुतांश कामे यंत्राद्वारे केली जातात. त्यामुळे मजूर टंचाईचाही प्रश्न भेडसावत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे.
चौकट
मातब्बर बागायतदार
काटी मंडळात वडगांवचे (काटी ) हणमंत गवळी यांच्याकडे ४५ एकर तर जळकोटवाडीच्या त्रिंबक फंड यांच्याकडे ६५ एकर तर माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे हे १७ एकर द्राक्ष बागेची जोपासना करतात. उत्पादित झालेली द्राक्ष परदेशात निर्यात केली जातात. दरम्यान, तामलवाडीचे बस्वराज मसुते व माळुब्रा येथील महादेव वडणे हे शेतकरी द्राक्ष बागायतदारांना सेंद्रिय द्राक्ष व्यवस्थापनाचे धडे बांधावर जाऊन देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत हाेत आहे.
दीड कोटीचे कर्ज वाटप
दोन वर्षांपूर्वी सांगवी (काटी) येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची शाखा उघडली. शेतकऱ्यांचा विश्वास जिंकत द्राक्षबागेचे वाढलेले क्षेत्र पाहता या शाखेने ४५ शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांचे कर्ज द्राक्ष बागेसाठी वाटप केले. या माध्यमातून बागायतदारांना दिलासा देण्याचे काम बॅंकेने केले असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे शाखाधिकारी विश्वास पवार यांनी नमूद केले.