नंदगावातील आराे प्लाँट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:14+5:302021-08-15T04:33:14+5:30
नंदगाव (जि. उस्मानाबाद) -तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लाँट बसविले. परंतु, ...

नंदगावातील आराे प्लाँट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा
नंदगाव (जि. उस्मानाबाद) -तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लाँट बसविले. परंतु, चार वर्षांच्या काळात ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळाले नाही. त्यामुळे सध्या दाेन्ही प्लाँट अक्षरश धूळखात पडून आहेत. याअनुषंगाने आता ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे शासकीय निधीतून ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ मध्ये प्रत्येकी २ लाख ७५ हजार रुपये या प्रमाणे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लाँट उभारले. ग्रामस्थांना शुद्ध पाणी माफक दरात मिळावे, हा या मागचा उद्देश. परंतु, दाेन्ही प्लाँट मागील चार वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये धूळखात पडून आहेत. आजवर ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळालेले नाही. हा मुद्दा सरपंच सरस्वती कलशेट्टी यांच्याकडे उपस्थित केला असता, ‘‘आपण सत्तेत येण्यापूर्वीच ही याेजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे याेजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी का पुरविले जात नाही, याचे कारण माझ्याकडे नाही. असे असले तरी काही दिवसांपूर्वीच सदरील याेजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ग्रामसेवकांना सूचना केली हाेती. मात्र, त्यांनी आजवर आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे तूर्तास हा प्लाँट बंदच आहे. दरम्यान, ग्रामसेवक रमेश धड्डे यांच्याकडे विचाणा केली असता, आरओ प्लाँट सुरू केल्यानंतर त्याचे वेस्टेज पाणी काेठे साेडायचे, हा प्रश्न आहे. आणि आमच्याकडे कर्मचारीही नाहीत. एवढेच नाही तर काेणी चालवायलाही घेत नाहीत, असे सांगितले.
चाैकट...
सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून आरओ प्लाँट बसविण्यात आले. परंतु, सुरू करण्याचे काेणी नाव घेत नाही. सुरूच करायचे नव्हते, तर प्लाँट बसविले कशासाठी? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही.
-प्रदीप वाघमारे, ग्रामस्थ, नंदगाव.
आरओ प्लाँट बसविल्यानंतर ते कार्यान्वित करणे गरजेचे आहे. परंतु, संबंधित मंडळी काम करून माेकळी झाली. ग्रामस्थांना पाणी मिळाे की न मिळाे, याची त्यांनी काळजी केली नाही. विद्यमान सरपंच, सदस्यांनी तरी याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-सुरेश जमादार, ग्रामस्थ, नंदगाव.