रुग्णवाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST2021-04-30T04:41:14+5:302021-04-30T04:41:14+5:30

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.या काळात कोरोना योद्धे म्हणून अनेकजण मदतीसाठी पुढे आले असून, त्यात रुग्णवाहिका चालकांची महत्त्वपूर्ण ...

Ambulance drivers travel with death | रुग्णवाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास

रुग्णवाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.या काळात कोरोना योद्धे म्हणून अनेकजण मदतीसाठी पुढे आले असून, त्यात रुग्णवाहिका चालकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ८२ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी १०८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी धावत आहेत. या रुग्णवाहिकेवर असलेल्या चालकांना १२ तास ड्युटी करावी लागत आहे. केवळ रुग्णवाहिका चालविणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, प्रसंगी रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेणे, त्यांना उचलून वाॅर्डात दाखल करणे ही कामेदेखील चालक मंडळी करीत आहेत. या चालकांना सुरक्षा कीट उपलब्ध असले तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. केवळ रुग्णवाहिका चालविणे या चालकांची जबाबदारी आहे; मात्र बहुतांश वेळा बाधित रुग्णाजवळ कोणीही येत नाही. अशावेळी या रुग्णांचे सिटी स्कॅन रिपोर्ट स्वत: आणणे ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना उचलून नेणे ही कामे चालकांना करावी लागतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडे मात्र कोणीही फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यांच्या या सेवेची दखल घेण्याची गरज आहे.

मागील तेरा महिन्यांपासून कोरोना रुग्णांची ने-आण करण्याची ड्युटी रुग्णवाहिकेवर करीत आहे. मे महिन्यात माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. उपचाराअंती बरा झालो. त्यानंतर पुन्हा सेवेवर दाखल झालो आहे. सध्या बारा तासांची ड्युटी करावी लागत आहे.

शहाजी इंगळे, रुग्णवाहिका चालक

कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचविणे, तसेच बरे झालेले रुग्ण घरी तसेच सीसीसी सेंटरमध्ये नेऊन सोडण्याचे रुग्णवाहिकेवर काम करीत आहे. दररोज २५ ते ३० रुग्णांची रुग्णवाहिकेतून वाहतूक करीत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई कीट, सॅनिटायझर, हँडग्लोजचा वापर करीत आहे.

शरद बोडके, रुग्णवाहिका चालक

कोविडच्या रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकेवर ड्युटी करीत असल्याने काळजी घेत आहे. पीपीई कीटचा वापर, नेहमी स्वच्छ हात धुण्यावर भर देत आहे. घरात लहान मुलगा असल्याने त्यास गावी पाठविण्यात आले आहे. पीपीई कीट, हँडग्लोज, सॅनिटायझरचा आरोग्य विभागाकडून पुरवठा होत आहे.

किरण देडे, रुग्णवाहिका चालक

८२

जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिका संख्या

कोविडसाठी रुग्णवाहिका १५

कोविडसाठी चालक संख्या ३२

नॉनकोविडसाठी रुग्णवाहिका ५७

चालक संख्या ५७

Web Title: Ambulance drivers travel with death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.