शिक्षणासाेबतच विद्यार्थ्यांत क्रीडा अन् कलेतील नैपुण्यतेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:32+5:302021-09-05T04:36:32+5:30

शिक्षक दिन विशेष... बालाजी आडसूळ कळंब (जि. उस्मानाबाद) : आपल्या शाळेतील बहुतांश विद्यार्थी कष्टकऱ्यांची लेकरे असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ...

Along with education, students also seek expertise in sports | शिक्षणासाेबतच विद्यार्थ्यांत क्रीडा अन् कलेतील नैपुण्यतेचा शोध

शिक्षणासाेबतच विद्यार्थ्यांत क्रीडा अन् कलेतील नैपुण्यतेचा शोध

शिक्षक दिन विशेष...

बालाजी आडसूळ

कळंब (जि. उस्मानाबाद) : आपल्या शाळेतील बहुतांश विद्यार्थी कष्टकऱ्यांची लेकरे असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झिजले पाहिजे, या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या भाटशिरपुरा शाळेतील प्रदीप रोटे यांनी शालेय अभ्यासक्रमासह स्पर्धात्मक परीक्षा, क्रीडा, चित्रकलेतही विद्यार्थ्यांना घडवत आपल्यातील आदर्श ‘गुरुजी’ची भूमिका निभावली आहे.

भाटशिरपुरा जि. प. प्राथमिक शाळेने राज्यभर एक आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवला आहे. शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिक अन् गुणात्मकदृष्ट्या कात टाकलेल्या या शाळेचे आंतरबाह्य रूपडे पालटले आहे. या विकासात प्रयोगशील शिक्षक प्रदीप रोटे यांचाही मोलाचा वाटा आहे. इतर सर्व शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावत शाळा अन् विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत रोटे गुरुजींनी नियमित अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, क्रीडानैपुण्याला अन् बुद्धिमत्तेला वाव देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जि.प. शाळांत शेतकरी, कष्टकऱ्यांची लेकरे धडे गिरवत असतात. त्यांना गुणवंत, ज्ञानवंत व प्रज्ञावंत करण्यासाठी प्रदीप रोटे सदोदित कार्यशील असतात. घड्याळाच्या ‘तासाला’ नव्हे तर विद्यार्थी ‘हिताला’ महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या रोटे गुरुजींचे आजवर १९ विद्यार्थी शालेय स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.

चौकट...

क्रीडा अन् कलेतील नैपुण्यतेचा शोध

प्रदीप रोटे यांनी कोथळा, हसेगाव शाळेनंतर भाटशिरपुरात कामाचा ठसा उमटवला आहे. नियमित अध्यापनासोबतच नवोदय, शिष्यवृत्ती अशा स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते मार्गदर्शन करतात. खो-खो ,उंच उडी खेळाचा सराव घेत पारंगत केलेल्या अनेक मुलांनी जिल्हा, तालुकास्तरावर डंका वाजवला आहे. चित्रकलेवर भर देत चिमुरड्यांच्या कल्पकतेला कुंचल्याच्या माध्यमातून वाव देण्याचे काम केले आहे.

परसबाग लावली अन् जपली...

भाटशिरपुरा येथील आदर्श शाळेत परसबाग जोपासण्यात आली आहे. याठिकाणी सहशिक्षक प्रदीप रोटे सातत्यपूर्ण हातभार लावत आहेत. वर्षातून दोनदा भाजीपाला लागवड केली जाते. त्याच्या वाढीसाठी विशेष लक्ष ठेवत प्रयत्न केले जातात. येथील पालक, कोथिंबीर अशा विविध भाजीपाल्यांचा शाळा सुरू असल्यावर पोषण आहारात वापर केला जातो, असे प्रदीप रोटे यांनी सांगितले. ऑनलाईन टेस्ट निर्मिती, इंग्लिश गेमिंग, वृक्षारोपण, गावातील जलसंधारण, कोविड काळातील सेवा अशा इतर विविध उपक्रमात रोटे यांचे दखलपात्र योगदान आहे.

Web Title: Along with education, students also seek expertise in sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.