तरूणाच्या हत्याकांडातील पाचही आराेपींना ठाेकल्या बेड्या
By बाबुराव चव्हाण | Updated: April 29, 2023 15:05 IST2023-04-29T15:03:47+5:302023-04-29T15:05:12+5:30
भरदुपारी झाला हाेता खून;आनंदनगर पाेलिसांची कारवाई

तरूणाच्या हत्याकांडातील पाचही आराेपींना ठाेकल्या बेड्या
धाराशिव - शहरातील सांजाराेडवरील भवानी चाैकात बुधवारी दुपारी ३:१५ वाजता एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने वार खून हत्या केली हाेती. या प्रकरणी पाच मारेकर्यांविरूद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. आराेपीच्या शाेधासाठी दाेन पथके रवाना करण्यात आली हाेती. या पथकांनी पाचही मारेकर्यांना बेड्या ठाेकल्या आहेत.
शेतातील बांधाच्या वादातून सांजा येथील राम ऊर्फ रामेश्वर किसन माेहिते या ३० वर्षीय तरूणाची बुधवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील सांजा राेडवरील भवानी चाैकात धारदार शस्त्राने वार करून निर्धृन खून केला हाेता. या प्रकरणी मयताचे वडील पांडुरंग किसन माेहिते यांनी आनंदनगर पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गावातील अक्षय रामहरी पडवळ, सागर रामहरी पडवळ, रणजित सुभाष सूर्यवंशी, नारायण नागनाथ डाेंगरे आणि काका चिवळादादा सूर्यवंशी (सर्व रा. सांजा) यांच्याविरुद्ध भादंसंचे कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास गुन्हा नाेंद झाला.
यापैकी सांजा येथील दत्तनगर भागातील रहिवासी नारायण नागनाथ डाेंगरे यास २७ एप्रिलच्या रात्री १२:५१ वाजता अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयासमाेर हजर केले असता, ३० एप्रिलपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहेत. उर्वरित चाैघा आराेपींनाही पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. या सर्वांना आज न्यायालयासमाेर उभे करण्यात येणार आहे. या हत्याकांडाचा तपास पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पाेलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली पाेनि दिलीप पारेकर व त्यांची टीम तपास करीत आहे.