स्मार्ट शेती! धाराशिवमध्ये सोयाबीनला 'AI'ची साथ; अतिवृष्टी होऊनही उत्पादनाने गाठली नवी उंची

By चेतनकुमार धनुरे | Updated: April 9, 2026 15:09 IST2026-04-09T15:08:46+5:302026-04-09T15:09:43+5:30

राज्यातील पहिलाच प्रयोग धाराशिवमध्ये यशस्वी, २४ टक्क्यांनी वाढले उत्पन्न

AI in Soybean Farming: Dharashiv Experiment Records 24% Increase in Yield Despite Heavy Rain | स्मार्ट शेती! धाराशिवमध्ये सोयाबीनला 'AI'ची साथ; अतिवृष्टी होऊनही उत्पादनाने गाठली नवी उंची

स्मार्ट शेती! धाराशिवमध्ये सोयाबीनला 'AI'ची साथ; अतिवृष्टी होऊनही उत्पादनाने गाठली नवी उंची

धाराशिव : राज्यात उसाच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मात्र, कोरडवाहू पिकांच्या बाबतीत हा प्रयोग झालेला नाही. धाराशिवच्या कृषी विभागाने आयआयटी मुंबई, परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या साथीने सोयाबीन पिकात एआय तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर केला व तो यशस्वी ठरला आहे. 

पावसाळ्यातील प्रचंड अतिवृष्टी झेलूनही सरासरी उत्पादनात २४ टक्क्यांची वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
धाराशिव जिल्हा हा अवर्षणप्रवण भागात मोडतो. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे. खरीप पिकांच्या एकूण साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रापैकी सरासरी साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. मागच्या पाच वर्षांमध्ये सलगपणे अतिवृष्टी, दीर्घ खंड, रोगराई, अशा विपरीत स्थितीला तोंड द्यावे लागल्याने २०२५ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढून ते पावणेपाच लाख हेक्टरपर्यंत गेले. त्यामुळे कृषी विभागापुढे सोयाबीनची उत्पादकता वाढवण्याचे आव्हान आहे. उसासाठी यशस्वी ठरलेला एआय तंत्रज्ञानाचा प्रयोग लक्षात घेत कृषी विभागाने आयआयटी मुंबई, परभणीचे कृषी विद्यापीठ यांच्या मदतीने सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रायोगिक अंमलबजावणी केली. उपळा गावात केलेल्या या प्रयोगाअंती विपरीत हवामान स्थिती असूनही उत्पादनात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून केली तरतूद
सोयाबीनमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या प्रयोगासाठी सुमारे ७ लाख रुपयांची आवश्यकता होती. कृषी विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीने नावीन्यपूर्ण योजनेच्या लेखाशीर्षाखाली या निधीची तरतूद करून दिल्याने प्रयोगाला मूर्त स्वरुप मिळाले.

उपळा गावात तंत्रज्ञानाचा प्रयोग
सोयाबीनसाठी एआय वापराचा हा पहिलाच प्रयोग होता. कृषी विभागाने यासाठी उपळा गावाची निवड करून तेथील २० शेतकऱ्यांचा गट तयार केला. त्यांच्या प्रत्येकी १ एकराचा प्लॉट तयार करून २० एकर जमिनीवर हा प्रयोग साधण्यात आला. एकाच वेळी लागवड करून पुढील मशागती एआय तंत्रज्ञानाच्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या.

पावसाचा घाव, तरीही मिळाले यश
प्रयोग केलेल्या मागील खरीप हंगामात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातलेला. वार्षिक सरासरी ६०४ मिमी असलेल्या जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत १००० मिमीचा पल्ला ओलांडला. सलग अतिवृष्टीने कहर केला. तरीही एआयच्या सल्ल्यानुसार केलेल्या पीक व्यवस्थापनामुळे एकरी सरासरी दीड ते २ क्विंटल सोयाबीनची उत्पन्न वृद्धी झाली.

व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न
जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून पहिल्यांदाच सोयाबीनसाठी एआय वापराचा प्रयोग करण्यात आला. ते यशस्वी ठरल्याने भविष्यात याची व्याप्ती वाढवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असणार आहे.
-राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.

Web Title : धाराशिव में सोयाबीन की उपज में एआई से वृद्धि, भारी बारिश के बावजूद।

Web Summary : धाराशिव कृषि विभाग ने सोयाबीन की खेती में एआई का सफलतापूर्वक उपयोग किया, जिससे अत्यधिक वर्षा के बावजूद उपज में 24% की वृद्धि हुई। जिला योजना समिति द्वारा वित्त पोषित इस नवीन परियोजना में उपलाई गांव के 20 किसान शामिल थे और यह बारानी कृषि में एआई की क्षमता को दर्शाता है।

Web Title : AI boosts soybean yields in Dharashiv despite heavy rainfall.

Web Summary : Dharashiv agriculture department successfully used AI in soybean farming, increasing yields by 24% despite excessive rainfall. The innovative project, funded by the District Planning Committee, involved 20 farmers in Uplai village and demonstrates AI's potential in rain-fed agriculture.