वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त, आता खुशाल खा चमचमीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:21+5:302021-06-18T04:23:21+5:30
उस्मानाबाद : गेल्या वर्षापासून सतत दरवाढीचे विक्रम नोंदविणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात १० ते २० रुपयांनी घसरण झाली आहे. तेल महागल्याने ...

वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त, आता खुशाल खा चमचमीत
उस्मानाबाद : गेल्या वर्षापासून सतत दरवाढीचे विक्रम नोंदविणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात १० ते २० रुपयांनी घसरण झाली आहे. तेल महागल्याने अनेकांनी चमचमीत खाण्यावर काहीअंशी लगाम लावला होता. मात्र, आता तेल स्वस्त झाल्याने गृहिणींना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
वर्षभरात पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसच्या किमती दिवसागणिक वाढू लागल्या आहेत. त्यातच खाद्यतेलाच्या दरातही मागील सहा महिन्यांपासून वाढ होत होती. रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर होत असतो. भाजीला फोडणी दिल्याशिवाय भाज्यांना चवही येत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात गृहिणी खाद्यतेलाचा वापर तोलून-मापून करीत असते. महागाईमुळे तर कमी तेलाची फोडणी तसेच चटपटीत तळलेले खाद्यपदार्थ बनविण्यास बगल दिली होती. देशात अमेरिका, मलेशिया आणि इंडोनेशियामधून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात होते. परंतु, काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बायो फ्यूलमध्ये ४६ टक्क्यांपर्यंत रिफाइंड ऑइल मिसळण्याची परवानगी होती. त्यामुळे तेलाचे भाव वाढले. आता ही टक्केवारी १३ इतकी करण्यात आली असल्याने तेलाच्या दरात घसरण झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मागील आठ दिवसांपासून शेंगदाणा, सोयाबीन, करडई, सूर्यफूल, मोहरी, पामसह सर्वप्रकारचे खाद्यतेल लिटरमागे १० ते २० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत आणखी तेलाचे दर कमी होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तविली आहे.
गृहिणींना काहीअंशी दिलासा
गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने खाद्यतेलाच्या दरातही मागील वर्षभरापासून वाढ होत आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींना किचनचे बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागत होती. कमी तेलाची फोडणी तसेच चटपटीत पदार्थ बनविण्यास बगल दिली होती. मात्र, आता तेलाच्या किमती कमी होऊ लागल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
तेल मे २०२१ जून २०२१
सूर्यफूल १६५ १५५
सोयाबीन १५० १३८
शेंगदाणा १८० १६८
पामतेल १४० १२८
करडी तेल १८० १६०
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
दहा वर्षांपूर्वी शेतात करडई, जवस, भुईमूग, सूर्यफूल असे तेलपीक घेतले जायचे. घाण्याचे तेल घरात वापरले जायचे, हे तेल वर्षभर पुरेल इतके असायचे. मात्र, मागील काही दिवसांपासून तेलपीक घेणे बंद झाले आहे, त्यामुळे विकतचे तेल घ्यावे लागत आहे.
बाबूराव काळे, शेतकरी
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वर्ष आर्थिक अडचणीचे गेले. तसेच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंतील खाद्यतेलाच्या किमती वाढल्या मात्र, तेलाची रोजच्या आहारात गरज असल्याने ते विकत घ्यावे लागत.
काशिनाथ जाधवर, शेतकरी