मराठी भाषेत घातली नव्या वाक्प्रचाराची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:49+5:302021-03-27T04:33:49+5:30

माडज : मोठा अर्थ कमी शब्दात आणि मार्मिकपणे व्यक्त करणे म्हणजे वाक्प्रचार. दररोजच्या संवादामध्ये सर्वजण वाक्प्रचाराचा सहजपणे वापर करत ...

Added new phrases in Marathi language | मराठी भाषेत घातली नव्या वाक्प्रचाराची भर

मराठी भाषेत घातली नव्या वाक्प्रचाराची भर

माडज : मोठा अर्थ कमी शब्दात आणि मार्मिकपणे व्यक्त करणे म्हणजे वाक्प्रचार. दररोजच्या संवादामध्ये सर्वजण वाक्प्रचाराचा सहजपणे वापर करत असतात. बोलण्या बोलण्यातून व अनेक पिढ्यांपासून हे वाक्प्रचार समाजामध्ये रूढ होऊन जात असतात आणि तेच वापरामध्ये असतात. परंतु, येथील ग्रामीण प्रशालेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वानुभवातून काही वाक्प्रचार तयार केले आहेत.

मराठी विषय शिकत असताना पाठामधून अनेक वाक्प्रचार येतात. त्या वाक्प्रचाराचा अभ्यास विद्यार्थी करतात. परंतु, पुस्तकातील वाक्प्रचार प्रत्यक्ष वापरामध्ये खूप कमी प्रमाणात असतात. यासाठीच उपक्रमशील शिक्षक डॉ. बालाजी मदन इंगळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवातून आपले स्वतःचे वाक्प्रचार तयार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी हे आवाहन स्वीकारले आणि शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळून नवीन वाक्प्रचार तयार केले. यात प्रामुख्याने करकटक दाखवणे म्हणजे भीती दाखवणे, शेळ्या राखणे म्हणजे शाळा बुडवणे, फुल्ल चार्ज होणे म्हणजे अतिउत्साही असणे, स्टेटस ठेवणे म्हणजे दिखाऊपणाचे करणे, तोंडाला मास्क लावणे म्हणजे बोलणे बंद करणे, जुन्या सायकलचे मडगार्ड असणे म्हणजे कोणत्याच कामाचा नसणे, डेक्सखाली लपणे म्हणजे घाबरणे, देवळात जाणे म्हणजे म्हातारपण येणे, चॉकलेट देणे म्हणजे मस्का मारणे असे जवळपास शंभरपेक्षा जास्त वाक्प्रचार विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून तयार केले आहेत. यानिमित्ताने मराठी भाषेमध्ये नवीन वाक्प्रचाराचा समावेश होत असून, विद्यार्थीही भाषा शिक्षणाचा आनंद घेत आहेत असल्याचे डॉ. इंगळे म्हणाले.

Web Title: Added new phrases in Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.