खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST2021-09-10T04:40:05+5:302021-09-10T04:40:05+5:30
लोहारा : तालुक्यातील रुद्रवाडी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक ...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस कोठडी
लोहारा : तालुक्यातील रुद्रवाडी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एकास न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले.
रुद्रवाडी येथे बुधवारी शिवाजी चंद्रकांत शिंदे (वय ३४) हे पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना वेळूच्या भरीव काठीने जबर मारहाण करीत होते. यावेळी शेजारी असलेले गुलचंद हरिबा शिंदे (वय ६०) हे भांडण सोडवायला गेले असता शिवाजी शिंदे यांनी त्यांनाही काठीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत ते बेशुद्ध पडले. यानंतरही आरोपीने पत्नी सरोजा शिवाजी शिंदे (वय ३०), आई जिजाबाई चंद्रकांत शिंदे (वय ५५), मुलगी कावेरी शिवाजी शिंदे (वय ५), मुलगा संतोष (वय ४) व मुलगी (वय ३) यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. या घटनेनंतर नागरिकांनी एकत्र येऊन आरोपीला पकडून घरात कोंडवल ठेवले व जखमींना उपचारांसाठी उमरगा येथे पाठविले. यातील बहुतांश जखमीचे प्रकृती गंभीर बनल्याने तेथून त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूरला पाठविण्यात आले. दरम्यान, यातील जखमी गुलचंद हरिबा शिंदे यांचा सोलापूरकडे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे हे घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले होते. मयताचा भाऊ भालचंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गुरुवारी ताब्यात घेतलेल्या शिवाजी शिंदे यास लोहारा न्यायालयात हजर केले असता त्यास १३ सप्टेंंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी दिली.