धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सलग दुसऱ्या दिवशीही तरूणाने संपवले जीवन
By बाबुराव चव्हाण | Updated: January 20, 2024 16:23 IST2024-01-20T16:18:48+5:302024-01-20T16:23:25+5:30
पाेलीस भरतीची तयारी करीत करणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने मृत्यूला कवटाळले.

धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सलग दुसऱ्या दिवशीही तरूणाने संपवले जीवन
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी काेणीही आपले जीवन संपवू नये, असे आवाहन मनाेज जरांगे पाटील वारंवार करीत आहेत. मात्र, दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी कळंब तालुक्यातील हळदगाव येथील पाेलीस भरतीची तयारी करीत करणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने मृत्यूला कवटाळले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शाेककळा पसरली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे. परंतु, सरकारने अद्याप आरक्षणाच्या बाबतीत ठाेस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी मुंबईकडे कूच केली आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी वाशी तालुक्यातील बावी येथील राजकुमार लहू शिंदे या तरूणाने खिशात चिठ्ठी ठेवून आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले.
या घटनेला चाेवीस तास लाेटण्यापूर्वीच कळंब तालुक्यातील हळदगाव येथील पाेलीस भरतीची तयारी करणाऱ्या केवळ २२ वर्षीय प्रतीक रंजित सावंत या तरूणाने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली. याही तरूणाने खिशात चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. संघर्ष करूनही आरक्षण मिळत नसल्याने मी माझे जीवन संपवित आहे. आता तरी सरकारने दखल घ्यावी’’, असा ‘त्या’ चिठ्ठीत मजकूर आहे. या घटनेमुळे हळदगावावर शाेककळा पसरली आहे.