भरधाव कार समाेरच्या वाहनावर आदळली, चालकाचा जागीच मृत्यू
By बाबुराव चव्हाण | Updated: July 18, 2023 13:57 IST2023-07-18T13:56:41+5:302023-07-18T13:57:58+5:30
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर पारगावनजीक झाला अपघात

भरधाव कार समाेरच्या वाहनावर आदळली, चालकाचा जागीच मृत्यू
पारगाव (जि. धाराशिव) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर पारगावनजीक भरधाव कारने समाेरील वाहनाला पाठीमागून जाेराची धडक दिली. या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना साेमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
पारगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर रुई पाटीजवळ साेमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारने (क्रं. एमएच.१२- सीवाय. ६४३८) समाेरील अज्ञात वाहनाला जाेराची धडक दिली. या भीषण अपघातात गाडीचे चालक लक्ष्मण गंगाधर बहीर (रा. शिरापूर, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. ते पंढरपूर येथे आत्याच्या मुलास आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
लक्ष्मण बहीर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० वाजता मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी अमित खुने हे उपस्थित हाेते. पारगाव बीटचे पाेहेकाॅ. आर. बी. लाटे, एन. एल. सय्यद, पी. बी. साठे यांनी पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.