Video: माकणी आगारात उभ्या बसला अज्ञातांनी पेटवले, मध्यरात्रीची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 12:00 PM2024-02-16T12:00:03+5:302024-02-16T12:02:10+5:30

लोकमंगल साखर कारखान्यातील अग्निशामन दलाने आग विझवली. मात्र तोपर्यंत बस ७५ टक्के जळून खाक झाली

A bus standing in Makani Agar was set on fire, a midnight incident | Video: माकणी आगारात उभ्या बसला अज्ञातांनी पेटवले, मध्यरात्रीची घटना

Video: माकणी आगारात उभ्या बसला अज्ञातांनी पेटवले, मध्यरात्रीची घटना

- बालाजी बिराजदार 
लोहारा (जि.धाराशिव ) :
लोहारा तालुक्यातील माकणी येथील बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास उमरगा आगराची मुक्कामी एक बस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द लोहारा पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माकणी येथील बसस्थानकांत दररोज उमरगा आगाराच्या तीन व औसा आगाराच्या दोन अशा एकूण पाच बस मुक्कामी असतात. पण गुरुवारी रात्री औसा आगाराने माकणी येथे मुक्कामी असलेल्या दोन्ही बस परत बोलावल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास उमरगा आगाराच्या तीन मुक्कामी एसटी बसपैकी एक बसला ( एमएच २० बीएल १७०१) अज्ञाताने पाठीमागील बाजूने आग लावून दिली. 

आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी वाहतूक नियंत्रक सुभाष आळंगे यांना माहिती दिली. आळंगे तात्काळ बसस्थानकात आले.  लोकमंगल साखर कारखान्यातील अग्निशामन दलाने आग विझवली. मात्र तोपर्यंत बस ७५ टक्के जळून खाक झाली होती. घटनास्थळी रात्रीच उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोकॉ विठ्ठल धवल यांच्या एसटी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन बस रात्रीच उमरगा येथे नेहण्यात आली. लोहारा पोलीस ठाण्यात बसचे चालक शिवाजी पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताच्या विरुध्द शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A bus standing in Makani Agar was set on fire, a midnight incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.