९ हजार जणांना मिळणार कोविडची प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:35+5:302021-01-13T05:24:35+5:30

भारत सरकारने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या लसींना मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी इन्ट्रामस्क्युलर पद्धतीने ...

9,000 people will get preventive covid vaccine | ९ हजार जणांना मिळणार कोविडची प्रतिबंधात्मक लस

९ हजार जणांना मिळणार कोविडची प्रतिबंधात्मक लस

भारत सरकारने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या लसींना मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी इन्ट्रामस्क्युलर पद्धतीने जिल्ह्याला मिळणार आहेत. व्यक्तींना कोणती लस मिळणार आहे. याची माहिती आरोग्य विभागास अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत यापैकी एक लस मिळणार असून, १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात पाच रुग्णालयांची निवडही करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर ५-५ जणांची टीम तैनात असणार आहे. ॲपवर नावाची पडताळणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी, व्यक्तीला लसीकरण कक्षात सोडण्यासाठी आरोग्य विभागाचा कर्मचारी, लसीकरण करण्यासाठी एक स्टाफ नर्स, लसीकरणानंतर अर्धा तास व्यक्तीला निगरानी कक्षात थांबावे लागणार आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाचा एक कर्मचारी असणार आहे. लस टोचल्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शन आली तर उपचाराची सोय म्हणून त्या केंद्रावर औषधी, ऑक्सिजन व डॉक्टरांची टीम असणार आहे.

चौकट...

या ठिकाणी होणार लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यातील पाच रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. यात उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, उमरगा, तुळजापूर, परंडा, कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. या प्रत्येक केंद्रावर प्रतिदिन १०० प्रमाणे ५०० जणांना लस टोचण्यात येणार आहे.

कोविन ॲपवर ९ हजार १०० जणांची नोंदणी

लसीकरणासाठी कोविन ॲपवर ९ हजार १०० व्यक्तींची नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणावेळी नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावाची ॲपवर पडताळणी करूनच लस देण्यात येणार आहे.

कोट...

कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण झालेली आहे. पाच केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडणार असून, त्याकरिता टीमही तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात शासकीय, खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व महसूल विभागाली कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

डॉ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी

Web Title: 9,000 people will get preventive covid vaccine