चालकास मारहाण करून ८०० बॅग तांदूळ असलेला ट्रक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:51 IST2018-10-20T16:49:45+5:302018-10-20T16:51:11+5:30
घटनेनंतर बेंबळी पोलिसांनी दीड तासात ट्रक ताब्यात घेऊन दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या़

चालकास मारहाण करून ८०० बॅग तांदूळ असलेला ट्रक पळविला
समुद्रवाणी (उस्मानाबाद) : चालक, क्लिनरला मारहाण करीत ८०० बॅग तांदूळ असलेला ट्रक चोरट्यांनी चोरून नेला होता़ घटनेनंतर बेंबळी पोलिसांनी दीड तासात ट्रक ताब्यात घेऊन दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या़ ही घटना शुक्रवारी रात्री उस्मानाबाद- औसा मार्गावरील पाडोळी शिवारात घडली़
चालक शमशोद्दीन हैदरसाहेब हसुरीवाले (रा. परतापूर ता. बसवकल्याण जि. बिदर) हे रायचूर (कर्नाटक) येथून ३० किलोच्या ८०० बॅग तांदूळ भरलेला ट्रक घेऊन सिल्वासा (गुजरात) येथे जात होते़ हा ट्रक शुक्रवारी रात्री उस्मानाबाद- औसा मार्गावरील पाडोळी (आ़) शिवारातील एका स्टोन क्रशरजवळ आला असता चोरट्यांनी रस्त्यावर दुचाकी आडवी लावून ट्रक थांबविला़ चालक शमशोद्दीन हसुरीवाले यांच्यासह क्लिनरला जबर मारहाण करीत ट्रक घेऊन त्या दोघांनी पोबारा केला़
यावेळी क्रशरचे हरिदास एकंडे यांनी तात्काळ पाडोळी दूरक्षेत्राचे पोहेकॉ हनुमंत चव्हाण यांना फोन करून घटनेची माहिती दिली़ घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ हनुमंत चव्हाण, पोकॉ. भागवत वाघमारे, पोलीस मित्र शाहुराज खराडे यांनी समुद्रवाणी पाटीजवळील विशाल धाब्याजवळ सापळा रचला़ याचवेळी गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, हेकॉ. तानाजी माळी, पोना. आण्णासाहेब खोगरे, चालक पोना. रविंद्र कचरे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ धाब्याजवळ आलेला ट्रक थांबवला.
पोलिसांनी ज्ञानेश्वर बाबासाहेब हुबाले (वय-२२) व राहुल शत्रुघ्न गायकवाड (वय-२८ दोघे रा़ येवती ता़उस्मानाबाद) या दोन आरोपींना ताब्यात घेतले़ घटनेनंतर बेंबळी पोलिसांनी तात्काळ हलचाली करून दीड तासातच ट्रकसह आरोपींना ताब्यात घेतले़ या प्रकरणी ट्रक चालक शमशोद्दीन हसुरीवाले यांच्या फिर्यादीवरून ट्रक चोरणाऱ्या दोघाविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि उत्तम जाधव हे करीत आहेत़
निलंग्यापासून पाठलाग
ट्रक पळविणारे आरोपी ज्ञानेश्वर हुबाले, राहुल गायकवाड या दोघांनी ट्रकचा निलंगा येथून पाठलाग सुरू केला होता़ पाडोळी शिवारात ट्रक आल्यानंतर त्यांनी दुचाकी रस्त्यावर आडवी लावून ट्रक पळवून नेला होता़