जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील जेवणातून ७० जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:28 IST2025-04-17T13:24:27+5:302025-04-17T13:28:03+5:30
ग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील जेवणातून ७० जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर
उमरगा ( धाराशिव) : तालुक्यातील कराळी येथील ७० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. रुग्णांवर सरकारी आणि खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
तालुक्यातील कराळी गावात एका कुटुंबाने मंगळवारी ( दि. १५) रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गावातील जवळपास अडीचशे ग्रामस्थांनी येथे जेवण केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी बुधवारी दुपारी काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून आली. जवळपास ४० रुग्णांना तुरोरी येथील विजय क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर याबाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी तात्काळ दवाखान्यास भेट दिली. रुग्णांची पाहणीकरून एक आरोग्य पथक कराळी गावात तपासणीसाठी पाठवले.
दरम्यान, १६ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर काहींवर गावातच उपचार सुरु केले आहेत. जवळपास ७० च्या आसपास विषबाधा झालेले रुग्ण आढळून आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार व तुरोरी येथील विजय क्लिनिकचे डॉ. विक्रांत शिंदे यांनी दिली.
सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर
कराळी येथे मंगळवारी जागरण गोंधळ कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून एक आरोग्य पथक कराळी गावातच ठेवण्यात आले आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
- डॉ. उमाकांत बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा