एचआयव्ही पॉझिटिव्ह २३ महिलांनी दिला बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST2021-01-16T04:36:32+5:302021-01-16T04:36:32+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या काळात जिल्हा एड्स व प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्याकडून १ लाख ६४ हजार ...

एचआयव्ही पॉझिटिव्ह २३ महिलांनी दिला बाळांना जन्म
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या काळात जिल्हा एड्स व प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्याकडून १ लाख ६४ हजार ४०० महिलांची एचआयव्ही चाचणी केली होती. यामध्ये ६६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यातील २३ गरोदर महिलांनी मागील वर्षभरात २३ निगेटिव्ह बालकांना जन्म दिला आहे.
एड्स निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील पुरुष व महिलांची एचआयव्ही चाचणी केली जाते. २०१६-१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीत ६४ हजार व्यक्तींची चाचणी केरण्यात आली होती. यामध्ये ६६ रिपाेर्ट पॉझिटिव्ह आले होते. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत २३ महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. बाळास एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये, यासाठी या २३ बाळांना जन्मानंतर ७२ तासांच्या आत डोस देण्यात आला आहे; मात्र ६ आठवडे, १२ आठवडे, सहा महिन्यांनंतर किती बालकांची चाचणी झाली आहे, याबाबत मात्र एड्स नियंत्रण विभागाकडे आकडेवारी मिळालेली नाही.
वर्षनिहाय पॉझिटिव्हीटीचा टक्का
२०१३-१४ १५७९२ ०.१७
२०१४-१५ ३४३४१ ०.११
२०१५-१६ ३८६४४ ०.०५
२०१६-१७ ३६२१५ ०.०६
२०१७-१८ ३२२७८ ०.०३
२०१८-१९ ३४३१२ ०.०५
२०१९-२० ३६०३२ ०.०२
२०२० डिसें. २५५६३ ०.०४
चौकट...
दरवर्षी होते तपासणी व समुपदेशन
एड्स नियंत्रण विभागाकडून ज्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. अशा ठिकाणी तपासणी व समुपदेशन केले जाते. शिवाय आता प्रत्येक गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी केली जात असल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
एचआयव्हीबाधित महिला गरोदर असल्यास तिने वेळेवर औषधोपचार, योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तर सहा महिने बाळाला अंगावर पाजले पाहिजे. नियमित तपासणी व आरोग्य विभागाचा सल्ला घेणेही आवश्यक असून, त्यामुळे बाळ निगेटिव्ह जन्माला येते.