शोधमोहिमेत सापडले १९३ रुग्ण, ४७७ गावांतील सर्वच ग्रामस्थांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST2021-02-05T08:16:38+5:302021-02-05T08:16:38+5:30

जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन विशेष उस्मानाबाद : जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक असून, आरोग्य विभागाच्या वतीने डिसेंबर ...

193 patients found in search operation, all villagers in 477 villages will be examined | शोधमोहिमेत सापडले १९३ रुग्ण, ४७७ गावांतील सर्वच ग्रामस्थांची होणार तपासणी

शोधमोहिमेत सापडले १९३ रुग्ण, ४७७ गावांतील सर्वच ग्रामस्थांची होणार तपासणी

जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन विशेष

उस्मानाबाद : जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक असून, आरोग्य विभागाच्या वतीने डिसेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत नवीन १९३ रुग्णांची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात अडीचशे रुग्ण उपचाराखाली आहेत. कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता जिल्ह्यात ८ फेब्रुवारीपासून ४७७ गावे व शहरी भागातील ४० वाॅर्डांत सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १४ लाख १९ हजार ५०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात ४ हजार ५७८ संशयित रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांची आरोग्य सेवक व आशा कार्यकर्तींमार्फत तपासणी करण्यात आली. यात १९३ रुग्ण आढळून आले. शिवाय, उपचार सुरू असलेले ५७ रुग्ण असे एकूण २५० रुग्ण झाले आहेत. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. अनेक व्यक्ती अंगावर चट्टे असतानाही अंधश्रद्धेपोटी स्वत:हून डॉक्टरांना दाखवून घेत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शोध मोहिमेत रुग्ण आढळून येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने आता सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण मोहीम राबविली जाणार असून, मोहिमेला ८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. मागील तीन वर्षांत ज्या गावात एक व त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशी ४७७ गावे व आठ तालुक्यांतील शहरी भागातील ४० वॉर्डांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात दोन वर्षे वयोगटापुढील सर्वच व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे.

चौकट...

२०१९ मध्ये आढळून आले होते २८१ रुग्ण

जिल्ह्यात जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत एकूण २८१ रुग्ण आढळून आले होते. यातील काही रुग्णांवर ६ व काही रुग्णांवर १२ महिने औषधोपचार करण्यात आले. यातील बहुतांश रुग्ण बरे झाले आहेत, तर काही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोट...

जिल्ह्यात कुष्ठरोग मोहिमेत १९३ रुग्ण आढळून आले आहेत. डिसेंबरअखेर एकूण २५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचाराअंती ९९ टक्के रुग्ण बरे होत असतात. मात्र, अनेक व्यक्ती स्वत:हून पुढे येत नाहीत. त्यामुळे ८ फेब्रुवारीपासून ४७७ गावे व शहरी ४० वाॅर्डांत सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण मोहीम राबविली जाणार आहे.

डॉ. रफिक अन्सारी

सहायक संचालक, कुष्ठरोग विभाग

Web Title: 193 patients found in search operation, all villagers in 477 villages will be examined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.