अद्यापही १३६ विद्यार्थ्यांना स्वाधारची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST2021-02-05T08:16:42+5:302021-02-05T08:16:42+5:30
उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ...

अद्यापही १३६ विद्यार्थ्यांना स्वाधारची प्रतीक्षा
उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. निधीअभावी ४१० विद्यार्थी दीड वर्षांपासून निर्वाह भत्यापासून वंचित होते. जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने २७४ विद्यार्थ्यांना भत्ता मिळाला आहे. मात्र, अद्यापही १३६ विद्यार्थी भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह व इतर खर्च भागविण्यासाठी दरवर्षी ५१ हजार रुपये भत्ता देण्यात येतो. दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यात येत असते. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यात ७१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील ३०० विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरले होते, तर ४१० विद्यार्थी पात्र ठरले हाते. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या तोंडावर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळे शासनाने योजनावरील निधी वर्ग करणे तातडीने थांबवून कोरोना उपाययोजनांवर भर दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सामाजिक न्याय विभागाने पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख ७७ हजार ५१० रुपयांचा निधी २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. दोन वर्षांनंतर भत्त्याची रक्कम मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, तर अद्यापही १३६ विद्यार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या भत्त्यासाठी हवे ६० लाख रुपये
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात ७१० अर्ज सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडे दाखल झाले होते. यातील ४१० विद्यार्थी पात्र ठरले होते. पहिल्या टप्प्यात २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर भत्त्याची रक्कम वर्ग झाली आहे. १३६ विद्यार्थी भत्ता रखडला आहे. या विद्यार्थ्यांसाठी ६० लाख रुपयांच्या निधीची मागणी सहायक समाज कल्याण कार्यालयाने राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे केली आहे.